नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या प्रशासनाला सूचना

पुणे: तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे. नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा, अशा सूचना पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिलेल्या आहेत. यासंदर्भात बोलताना डॉ. देशमुख म्हणाले, तंबाखूचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेवून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध कायद्याबाबत व्यापक स्वरूपात जनजागृती करावी. तसेच कायद्याबाबत नियमित प्रशिक्षणावर भर द्यावा. नागरिकांनीही अशा पदार्थांचे सेवन टाळणेही गरजेचे आहे.
कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व धूम्रपान करणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करावा, कोरोना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून ही कारवाई पोलीस व संबंधित विभागांनी कटाक्षाने राबवावी, असे निर्देशदेखील डॉ. देशमुख यांनी दिलेले आहेत. दरम्यान, सर्व शासकीय कार्यालये, पोलीस स्टेशन आदी कार्यालये तंबाखूमुक्त करण्यासाठी संबंधित विभागांनी व कार्यालय प्रमुखांनी प्रयत्न करावा. शिक्षक हे विद्यार्थ्यांसमोर आदर्शस्थानी असल्यामुळे शिक्षकांनी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करता कामा नये. ‘तंबाखू मुक्त शाळा अभियान’ यशस्वीपणे राबविण्यासाठी शिक्षण विभाग व जिल्हा परिषदेने नियोजन करावे, असेही डॉ.देशमुख यांनी सांगितलेले आहे.