ताज्या घडामोडीपुणे

पुण्याच्या पावसात तीस वर्षांत वाढ; हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो?

पुणे | प्रतिनिधी 

  पुण्यात कायम रिपरिप आणि संथ लयीत पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात अलीकडच्या काही वर्षांत बदल होत असल्याच्या निरीक्षणावर ‘भारतीय हवामानशास्त्र विभागा’ने (आयएमडी) मोहोर उमटवली आहे. १९५१-८० या कालावधीत पावसाळी हंगामात पडणाऱ्या सरासरी ५४६ मिमी पावसात १९८१ ते २०१० या तीस वर्षांच्या कालावधीत शंभर मिलीमीटरनी वाढ झाली आहे.

पुण्याचा जून ते सप्टेंबर या कालावधीतील सरासरी पाऊस आता ६४७ मिमीवर पोहोचला आहे. ‘आयएमडी’तील हवामाशास्त्रज्ञांनी गुरुवारी देशभरातील सरासरी मान्सून कमी झाल्याचे जाहीर केले असतानाच पुण्यात मात्र, पावसाचे सरासरी प्रमाण वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. हवामानातील तीव्र बदलांमुळे गेल्या काही दशकात वादळांची तीव्रता वाढली आहे. पूर्व मोसमी पाऊस, मान्सूनचे आगमन, त्यातील सातत्यात चढउतार होत आहेत. मान्सूनचा परतीचा प्रवासही लांबणीवर गेला आहे. एवढेच नव्हे, तर पाऊस पडण्याचे दिवस कमी झाले असतानाच पावसाचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. ‘भारतीय हवामानशास्त्र विभागा’तर्फे पुण्यातील पावसाची सरासरी वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाते. त्यानुसार १९५१ ते १९८० या कालावधीत जून ते सप्टेंबरमध्ये पुण्यात सरासरी ५४६ मिलीमीटर पावसाची नोंद होती. अलीकडील तीन दशकांत म्हणजेच १९८१ ते २००९ या काळातील नोंदीनुसार पाऊस पडण्याच्या प्रक्रियेत बदल होत आहेत. त्यामुळे हंगामाचे सरासरी प्रमाण शंभर मिलीमीटरनी वाढून ६४६ मिलीमीटरपर्यंत पोहोचले आहे.

पूर्वीच्या तुलनेत जूनमधील पावसाचे दिवस वाढले असून, पावसाच्या सरासरी प्रमाणात साठ मिलीमीटरनी वाढ झाली आहे. याउलट जुलैमधील पावसाचे दिवस आणि पावसाच्या प्रमाणात थोडी घट झाली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांत सरासरी पावसात उल्लेखनीय वाढ झाली आहे. पुण्यात चार महिन्यांत पूर्वी सरासरी ३९ दिवस पाऊस पडत होता. त्यात आता एका दिवसाची वाढ होऊन पावसाचे सरासरी दिवस चाळीस झाले आहेत. मात्र, तेवढ्याच दिवसांत पावसाचे प्रमाण शंभर मिलीमीटरनी वाढले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button