ताज्या घडामोडीपुणे

पुणे महानगर परिवहन महामंडळा’च्या (पीएमपी) बाणेर ई-बस डेपो ‘विना करंट’

पुणे | प्रतिनिधी

‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’च्या (पीएमपी) बाणेर येथील ई-बस डेपोसाठी ‘महावितरण’कडून स्वतंत्र ‘डीपी’ बसविण्याची प्रतीक्षा असतानाच महापालिका आणि ‘पीएमपी’ प्रशासनाने डेपोच्या उद्घाटनाचा घाट घातल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर अवघ्या पंधरवड्यातच डेपोला अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. बस चार्जिंगसाठी ४५०० किलोवॉट विजेची आवश्यकता असताना ‘डीपी’अभावी सध्या केवळ १२०० किलोवॉट वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे ई-बसच्या चार्जिंगला अडथळा येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बाणेर डेपोचे उद्घाटन करण्यात आले. ‘पीएमपी’च्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या बसपैकी ७० बसची सेवा या डेपोतून सुरू होणार होती. पहिल्या टप्प्यांत पाच मार्गांवर सेवा सुरू झाली. ‘पीएमपी’च्या ताफ्यात नव्याने १४० ई-बस दाखल झाल्या. येत्या काळात त्यांची संख्या वाढविण्याचे ‘पीएमपी’चे नियोजन आहे. मात्र, पुरेशा क्षमतेने वीजपुरवठा होत नसल्याने ई-बसचे चार्जिंग होत नाही. दरम्यान, ‘महावितरण’ने स्वतंत्र ‘डीपी’ उभारावा यासाठी महापालिकेकडून पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे काही दिवसांत पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा सुरळीत होईल, अशी आशा ‘पीएमपी’ अधिकाऱ्यांना आहे.

बाणेर डेपोमध्ये चार्जिंग स्टेशनला वीजपुरवठा करण्यासाठी ‘महावितरण’ने असमर्थता दर्शविली होती. या डेपोमध्ये आवश्यक क्षमतेने वीजपुरवठा करण्यासाठी ‘उपकेंद्र’ उभारावे लागणार आहे. हे ‘सबस्टेशन’ उभारायचे झाल्यास महापालिकेची जागा लागणार आहे. भेकराईनगर डेपोत ५१ आणि निगडी डेपोत ३० चार्जिंग पॉइंट आहेत. या ठिकाणी ताफ्यातील जुन्या ई-बसचे चार्जिंग केले जाते. नव्याने दाखल झालेल्या १४० बसचे चार्जिंग बाणेर येथील डेपोमध्ये केले जाणार आहे. सध्या १४० पैकी केवळ ३० बसचे चार्जिंग होत असून, ११० ई-बस वापराविना डेपोतच उभ्या आहेत.

बाणेर डेपोतून सध्या म्हाळुंगे ते मनपा, हिंजवडी ते कात्रज, हिंजवडी ते डांगे चौक, हिंजवडी ते विमानतळ आणि हिंजवडी ते भोसरी या मार्गांवर ई-बस धावतात. या डेपोमध्ये चार्जिंग स्टेशनसाठी आवश्यक ‘महावितरण’चा स्वतंत्र ‘डीपी’ उभारला जात नाही, तोपर्यंत या डेपोतील मार्गांची संख्या वाढण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे देशातील पहिल्या ई-बस डेपोला सुरुवातीपासूनच अडथळ्यांचे ग्रहण लागले आहे.

बाणेर परिसरात सध्या महावितरणकडे विजेची मागणी जास्त असल्याने ई-बसच्या चार्जिंगसाठी आवश्यक वीजपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र उपकेंद्र उभारावे लागणार आहे. त्यासाठी मोठ्या जागेची गरज असून, जागेचा शोध सुरू आहे.

– श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button