TOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत राष्ट्रवादीचं प्लॅनिंग काय आहे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी स्पष्ट केली भूमिका…

पुणे : गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता असून, या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याचे सांगण्यात येते. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी हे विधान केले.‘पुणे लोकसभा मतदारसंघाविषयीही आम्ही आधी पक्षांतर्गत व नंतर महाविकास आघाडीशी चर्चा करू,’ असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी पुण्यात शिरूर, भिवंडी आणि जालना या लोकसभा मतदारसंघांसाठी आढावा बैठक घेण्यात आली. ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री राजेश टोपे व जितेंद्र आव्हाड, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार सुनील टिंगरे, चेतन तुपे आदी या बैठकीला उपस्थित होते.

‘गेल्या काही वर्षांत मतदारसंघांमधील बदललेली राजकीय परिस्थिती, स्थानिक वातावरण, पक्षीय ताकद या सर्व गोष्टींवर आम्ही पक्षांतर्गत चर्चा करू. बदललेल्या मतदारसंख्येचाही विचार करू. त्यानुसार आमचे म्हणणे आम्ही महाविकास आघाडीच्या बैठकीत मांडू. साहजिकच पुणे लोकसभा मतदारसंघाविषयची चर्चाही आम्ही करू,’ असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

‘लोकसभा निवडणुकांना अजून वर्षभर अवकाश आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. काँग्रेस व शिवसेनाही (ठाकरे गट) त्यांच्या स्तरावर आढावा घेत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल,’ असे असेही पाटील म्हणाले. ‘एकनाथ खडसे पक्षात चांगले काम करत आहेत, त्यामुळे ते पुन्हा भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,’ असे जयंत पाटील म्हणाले.

जालन्यातून राजेश टोपे?
जालना लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय वाघचौरे, चंद्रकांत दानवे हे उमेदवार इच्छुक आहेत. मात्र, कार्यकर्त्यांनी बैठकीमध्ये माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाच उमेदवारी द्यावी, अशी आग्रही मागणी केली. टोपे यांनी मात्र, आपण इच्छुक नसल्याचे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

आमदारांवर सोपवली जबाबदारी
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आमदार चेतन तुपे यांच्याकडे हडपसर, खडकवासल्यासह पुणे लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आमदार सुनील शेळके यांच्याकडे मावळमधील पिंपरी व चिंचवड हे मतदारसंघ, तसेच शिरूरमधील उर्वरित विधानसभा मतदारसंघ, तर आमदार अशोक पवार यांच्याकडे खडकवासला वगळता बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button