breaking-newsताज्या घडामोडीपुणेव्यापार

स्टार्टअपमध्ये पुणे ‘जगात भारी’; जगात पहिल्या तब्बल शंभर शहरांत पुण्याचा समावेश

पुणे : ‘स्टार्टअप’साठी सर्वोत्तम वातावरण असलेल्या जगातील पहिल्या शंभर शहरांमध्ये प्रथमच पुणे शहराचा समावेश झाला आहे. यंदाच्या जागतिक स्टार्टअप परिसंस्था (इकोसिस्टीम) निर्देशांकामध्ये पुण्याने चौदा शहरांना मागे टाकून या यादीत नव्वदावे स्थान मिळवले आहे. इस्रायलमधील ‘स्टार्टअप ब्लिंक’ या संस्थेने नुकताच जागतिक स्टार्टअप परिसंस्था निर्देशांक २०२२ हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात ‘स्टार्टअप’साठी अनुकूल वातावरण असलेल्या शंभर देश आणि एक हजार शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ‘स्टार्टअप’चे प्रमाण, गुणवत्ता आणि व्यावसायिक वातावरण या निकषांवर देश आणि शहरांची निवड करण्यात आली.

या अहवालानुसार, ‘स्टार्टअप’साठी पूरक संस्कृती असलेल्या पहिल्या शंभर देशांच्या यादीत भारताने एका स्थानाची आघाडी घेऊन, १९वा क्रमांक मिळविला आहे, तर सर्वोत्तम ‘स्टार्टअप’ परिसंस्था असलेल्या पहिल्या शंभर शहरांमध्ये प्रथमच पुण्याने स्थान मिळविले आहे. देशातील आणि दक्षिण आशियातील ‘स्टार्टअप’ अनुकूल परिसंस्था असलेल्या शहरांच्या यादीत पुणे चौथ्या क्रमांकावर आहे. पुणे शहर वाहतूक, ई-कॉमर्स व रिटेल आणि शैक्षणिक ‘स्टार्टअप’साठी आदर्श ठिकाण आहे, असे अहवालात म्हटले आहे. शहरातील वाहतूक विषयातील ६१ ‘स्टार्टअप’, ई-कॉमर्स व रिटेल क्षेत्रातील २५ ‘स्टार्टअप’ आणि शिक्षण विषयातील १९ ‘स्टार्टअप’चा ‘स्टार्टअप ब्लिंक’ संस्थेच्या नकाशावर आले आहेत. या निर्देशांकात पहिल्या पाच देशांमध्ये अमेरिका, ब्रिटन, इस्राईल, कॅनडा आणि स्वीडन या देशांचा समावेश आहे. पहिल्या पाच शहरांमध्ये अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को बे प्रथम असून, न्यूयॉर्क आणि लंडनने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला आहे.

  • बेंगळुरू जगात आठव्या स्थानी

देशात ‘स्टार्टअप’साठी सर्वांत चांगले वातावरण असलेल्या बेंगळुरू शहराने पहिल्या शंभर सर्वोत्तम स्टार्टअप परिसंस्था असलेल्या शहरांच्या यादीत आठवा क्रमांक मिळविला आहे. नवी दिल्ली या यादीत तेराव्या क्रमांकावर आहे, तर मुंबई एक स्थान घसरून सतराव्या क्रमांकावर आली आहे. पुण्यापाठोपाठ हैदराबादनेही पहिल्या शंभर शहरांच्या यादीत स्थान मिळविले आहे. याशिवाय चेन्नई (१०२), जयपूर (२१२), पाटणा (२१८), अहमदाबाद (२२३) आणि गोवा (२७२) यांसह ३२ शहरांचाही निर्देशांकातील पहिल्या हजार शहरांमध्ये समावेश आहे.

  • जागतिक ‘स्टार्टअप’ परिसंस्था निर्देशांक

(भारतीय शहरांची कामगिरी)

शहर राष्ट्रीय क्रमांक जागतिक क्रमांक सर्वोत्तम स्टार्टअप क्षेत्र

बेंगळुरू १ ८ एज्युटेक

नवी दिल्ली २ १३ वाहतूक

मुंबई ३ १७ एज्युटेक

पुणे ४ ९० वाहतूक

हैदराबाद ५ ९७ एज्युटेक

चेन्नई ६ १०२ एज्युटेक

जयपूर ७ २१२ ई-कॉमर्स आणि रिटेल

शहरात स्टार्टअप संस्कृती रुजण्यासाठी अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना चांगले फळ येत आहे. उद्योग संघटना, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आदी संस्थांनी मोलाचे योगदान दिले आहे. अनेक महाविद्यालयांनी स्टार्टअप इनक्युबेशन केंद्रे सुरू केली आहेत. पुण्यात पाच ते सहा युनिकॉर्न ‘स्टार्टअप’ आहेत. पुण्यात ‘स्टार्टअप’ आणि नवनिर्मितीसाठी अनुकूल वातावरणामुळे जगभरातील गुंतवणूकदार येथे आकर्षित होतील.

– प्रशांत गिरबने, महासंचालक, एमसीसीआयए

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button