TOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यातील सार्वजनिक वाहतूक, मॉल, उद्याने, शाळांबाबत आज होणार निर्णय

पुणे | पुण्यातील सार्वजनिक वाहतूक, उद्याने, मॉलमधील उपस्थिती आणि शाळांसंदर्भात काही कठोर निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांच्याबरोबर मंगळवारी (४ जानेवारी) होणाऱ्या करोना आढावा बैठकीत यासंदर्भात चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. महापालिकेकडून त्याबाबतची स्पष्ट भूमिका या बैठकीत मांडण्यात येणार आहे. दरम्यान, अस्तित्वातील निर्बंधाची काटेकोर अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ओमायक्रॉन विषाणू उत्परिवर्तनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील करोना संसर्ग वेगाने वाढण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत आढावा बैठक घेण्यात आली. शहरातील वाढती रुग्णसंख्या, आरोग्य सज्जतेचा आढावा घेतानाच उपाययोजनांबाबतची आखणी या बैठकीत करण्यात आली. महापालिका आयुक्त विक्रम कुमार, आरोग्य विभागातील अधिकारी, सर्वपक्षीय गटनेता, महापालिकेतील प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत अस्तित्वातील निर्बंधाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निश्चित करण्यात आले. त्याबाबतची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. उपमहापौर सुनीता वाडेकर, सभागृहनेता गणेश बीडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने या वेळी उपस्थित होते.

करोना संसर्ग वाढत असला तरी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. कठोर निर्बंधाऐवजी सध्याच्या निर्बंधाची काटेकोर अंमलबजावणी करणे योग्य ठरेल, असे या बैठकीत निश्चित करण्यात आले. शहरातील शाळा ऑनलाइन पद्धतीने घ्याव्यात, असे पालक, वैद्यकीय तज्ज्ञ आणि कृती दलाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्याबरोबरच मॉल, सार्वजनिक वाहतूक आणि उद्यानांसह अन्य सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी काय निर्णय घ्यायचा, याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत घेतला जाईल. शाळा सुरू न करण्याबाबतची पालकांची मागणी बैठकीत मांडली जाईल, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले.

शहरात करोना संसर्गाचे अडीच हजार सक्रिय रुग्ण आहेत. यामध्ये ७० ते ७५ टक्के रुग्णांनी करोना प्रतिबंधक लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्याचे बैठकीत आकडेवारीवरून पुढे आले. मात्र त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. लस घेतलेल्यांना सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. प्राणवायू सज्जता, करोना काळजी केंद्र, उपचार केंद्रांचा आढावा घेण्यात आला आहे. सक्रिय रुग्णांपैकी केवळ ३४० रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असून त्यांना सौम्य लक्षणे दिसून येत आहेत.

३ लाख नागरिकांची दुसरी मात्रा घेण्यास टाळाटाळ

शहरातील ३ लाख नागरिकांनी करोना प्रतिबंधक लशीची दुसरी मात्रा अद्याप घेतलेली नाही. त्यामुळे या नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आरोग्य यंत्रणेकडून केला जाणार आहे, असे महापौर मोहोळ यांनी सांगितले. आकडेवारी तीन लाख असली तरी यामध्ये स्थलांतरित लोकसंख्याचा समावेश असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याची माहिती घेण्याचे आदेशही आरोग्य यंत्रणेला देण्यात आले आहेत. १५ ते १८ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण वेगाने करण्याबरोबरच आघाडीच्या क्षेत्रातील कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक तसेच सहव्याधी रुग्णांना वर्धक मात्रा दहा जानेवारीपासून दिली जाणार आहे. त्याबाबतचे नियोजनही करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button