breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

लोकसंवाद : शरद पवार यांच्या महिला सक्षमीकरण विचाराला पिंपरी-चिंचवडमध्ये तिलांजली!

महिला नगरसेवविका क्षमता असतानाही अडगळीत

स्थानिक नेत्यांच्या पुरूषसत्ताक मानसिकतेचा फटका

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

देशाच्या राजकारणातील प्रभावी नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा वाढदिवस त्यांच्या विचारांचा आणि सामाजिक कार्याचा आदर्श सांगून साजरा केला जात आहे. ही बाब स्वागतार्ह असली तरी, महिला सक्षमीकरणासाठी राजकारणात ५० टक्के आरक्षणाचा विचार पुढे आणून प्रत्यक्षात अंमलबजावणी करणाऱ्या पवार साहेबांच्या विचारांना पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक पुरूषसत्ताक नेत्यांमुळे तिलांजली दिली जात आहे.

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तिकीटावर एकूण ३६ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यापैकी १४ महिला आहेत. मात्र, आतापर्यंत एकाकी महिला नगरसेवकाला विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळाली नाही.

ज्येष्ठ नगरसेविका अपर्णा डोके, डॉ. वैशाली घोडेकर, अनुराधा गोफणे, पौर्णिमा सोनवणे, शितल काटे, माजी महापौर मंगला कदम, सुशीला मंचरकर अशा अनुभवी नगरसेविका असतानाही पक्ष संघटना आणि कार्यक्रमापासून गेल्या पाच वर्षांत ‘वंचित’ राहिल्या आहेत.

आगामी महापालिका निवडणुकीत पक्षातील स्थानिक नेते आपल्या दृष्टीकोनातून निर्णय घेत असताना महिला नगरसेविका आणि पदाधिकारी यांनाही निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेणे अपेक्षीत आहे.

याउलट, सत्ताधारी भाजपाकडून गेल्या पाच वर्षांमध्ये स्थानिक नेते आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून स्थायी समितीवर सीमा सावळे, ममता गायकवाड यांना संधी दिली. उपमहापौरपदासाठी शैलजा मोरे, हिरानानी घुले यांना मान मिळाला. तसेच, महापौरपदासाठी ज्येष्ठ नगरसेविका उषा उर्फ माई ढोरे यांना बहुमान मिळाला आहे. तसेच, विविध समित्यांवर अध्यक्षपदी महिलाच काम करीत आहेत.

विरोधी पक्षनेतेपदावर पुरूषांनाच संधी…

डॉ. वैशाली घोडेकर विरोधी पक्षनेते पदाच्या शर्यतीत असतानाही त्यांना संधी मिळाली नाही. ओबीसी समाजाचा चेहरा असलेल्या डॉ. घोडेकर यांना यापूर्वी महापौरपदाचा अनुभव आहे. त्यामुळे सभागृहात विरोधी पक्षनेता म्हणून त्यांना सक्षमपणे बाजू मांडता आली असती मात्र गेल्या पाच वर्षांत त्यांना संधी मिळाली नाही. अपर्णा डोके यांनीही महापौरपद देण्यात आले. मात्र, चिंचवड भाजपाचा बालेकिल्ला असताना डोके यांनी आपले वर्चस्व राखले आहे. त्यामुळे चिंचवडमधून विरोधी पक्षनेतेपदी त्यांना संधी मिळणे अपेक्षीत होते.

पिंपरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उच्चशिक्षित नगरसेविका म्हणून डॉ. सुलक्षणा शिलवंत-धर यांची ओळख आहे. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांत सुलक्षणा पक्षांतर्गत पुरूषसत्ताक मानसिकतेच्या ‘शिकार’ झाल्या आहेत. पक्षांतील ज्येष्ठ नेत्यांकडून सुलक्षणा यांना ‘टार्गेट’ केले जात आहे. स्पर्श प्रकरण, मास्क खरेदी प्रकरणी पक्षातीलच लोकांकडून भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत.

…तरपिंपरी-चिंचवड शहराला पहिली महिला आमदार मिळाली असती !

वास्तविक, २०१७ मध्ये पहिल्याच प्रयत्नात महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या डॉ. सुलक्षणा शिलवंत-धर यांनी लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांचे जातीने  प्रचार केला. त्यावेळी शहरातील काही मातब्बर मंडळी विरोधी उमेदवाराला छुप्या पद्धतीने मदत करीत होती. डॉ. अशोक शिलवंत यांचा आंबेडकरी समाजात दांडगा जनसंपर्क होता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशीही स्नेहपूर्ण संबंध होते. त्यामुळे डॉ. सुलक्षणा यांनी २०१९ मध्ये विधानसभेची उमेदवारी खेचून आणली. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील पुरूषसत्ताक मानसिकतेच्या नेत्यांनी सुलक्षणा यांच्या उमेदवारीला विरोध केला. त्यावेळी सुलक्षणा यांना संधी मिळाली असती, आज पिंपरी-चिंचवड शहराला पहिली महिला आमदार मिळाली असती. विशेष म्हणजे, सध्यस्थितीला डॉ. सुलक्षणा यांना महापालिका निवडणुकीतच पराभूत करण्यासाठी राष्ट्रीवादीचेच नगरसेवक कामाला लागले आहेत. किंबहूना, पक्षांतर्गत विरोधाला कंटाळून सुलक्षणा यांनी अन्य पक्षात प्रवेश करावा. याकरिता इतर पक्षांच्या मदतीने प्रयत्न केले जात आहेत, अशी स्थिती आहे. ज्या शरद पावार यांनी राजकारणात महिलांना समान वागणूक दिली. त्याच पवार यांच्या वाढदिनी शहरात तीन ठिकाणी अभिष्टचिंत न सोहळ्याचे आयोजन केले. त्यापैकी पिंपरी मतदार संघातील आयोजनाची भूमिका डॉ. सुलक्षणा यांच्याकडे होती. ही बाब स्थानिक नेत्यांनी लक्षात घेतली पाहिजे. तसेच, शरद पवार यांचा महिलांसाठी असलेला दृष्टीकोन अंगी बानवला पाहिजे. आगामी काळात निश्चितपणे शहरातील राष्ट्रवादीला सुवर्णकाळ येईल, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button