breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडलेख

लोकसंवाद : माजी आमदार विलास लांडे यांनी सोशल मीडियावर ‘फुंकले रणशिंग’ अन्‌ अवघ्या तीन तासांत ‘तलवार म्यान’

राष्ट्रवादीच्या शहर पदाधिकाऱ्यांविरोधात दंड थोपाटले पण…

पक्षांतर्गत बाब चव्हाट्यावर आणल्यामुळे निष्ठावंतांमध्ये नाराजी

पिंपरी । अधिक दिवे

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ‘पितामह भीष्माचार्य’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी रविवारी सकाळी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात पक्षनिष्ठतेच्या मुद्यावर ‘रणशिंग फुंकले’. मात्र, पक्षाची बदनामी होत असल्याचे लक्षात येताच अवघ्या तीन तासांत ‘तलवार म्यान’ केली. अर्थात संबंधित ‘वादग्रस्त पोस्ट’ लांडे यांना ‘डिलिट’ करावी लागली.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दिमाखात साजरा झाला. विविध सामाजिक उपक्रम राबवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला लक्षवेधी मानवंदना दिली. पण, पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीतील पहिल्या फळीतील बहुतेक नेत्यांनी माजी आमदार विलास लांडे यांचा फोटो फ्लेक्स आणि कार्यक्रम पत्रिकेवर फोटो घेणे टाळले. वास्तविक, राष्ट्रवादीत लांडे यांचे स्थान अढळ आहे. किंबहुना लांडे यांच्याएव्हढा सामर्थ्यवान स्थानिक नेता सध्यस्थितीला शहर राष्ट्रवादीकडे नाही. मात्र, राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या अनेकांना लांडे यांचे नेतृत्त्व अमान्य आहे.
याबाबत ‘महाईन्यूज’ने  ‘‘लोकसंवाद : राष्ट्रवादीतील अतिमहत्त्वाकांक्षी लोकांकडून माजी आमदार विलास लांडे ‘साईड कॉर्नर’?’’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. दरम्यान, युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख शहरात आले होते. शाखा उद्घाटन आणि इतर कार्यक्रम पार पडल्यानंतर शेख यांनी पत्रकार परिषद घेतली. तत्पूर्वी, माजी आमदार लांडे यांच्या निवासस्थानीसुद्धा शेख यांनी भेट दिली होती, असे सांगितले जाते.
शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी प्रकरण सावरले पण…
माजी आमदार लांडे यांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चेत शहरातील अनेक पदाधिकारी भाजपाची छुपा घरोबा करीत आहेत, असा आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली होती. युवक प्रदेशाध्यक्षांसमोर पक्षातील मतभेदांवर चर्चा झाल्यामुळे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी प्रकरण सावरण्याचा प्रयत्न केला. ‘‘राष्ट्रवादीत कसलेही गट-तट नाहीत. आम्ही महापालिका निवडणुकीत एकोप्याने लढणार आहोत. एखाद्या फ्लेक्सवर कुणाचा फोटो आला नसेल, तर त्याचे राजकारण करण्याचा विषय नाही’’ अशी समंजस भूमिका पत्रकार परिषदेत जाहीरपणे वाघेरे-पाटील यांनी मांडली होती. त्यामुळे ‘फ्लेक्स आणि फोटो’ प्रकरणावर पडदा पडला होता. मात्र, माजी आमदार विलास लांडे रविवारी सकाळी ‘फेसबूक पेज’वर जाहीरपणे नाराजी व्यक्त करणारी आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या पक्षनिष्ठेची चिरफाड करणारी ‘पोस्ट’ टाकली. शहराच्या राजकीय वर्तुळात संबंधित ‘वादग्रस्त पोस्ट’ काही मिनिटांत तुफान ‘व्हायरल’ झाली. माजी आमदार लांडे यांनी पक्षांतर्गत विषय चव्हाट्यावर मांडल्यामुळे निष्ठावंतांमध्ये नाराजी व्यक्त होवू लागली. तीन-साडेतीन तासांनंतर लांडे यांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर संबंधित ‘वादग्रस्त पोस्ट’ अखेर ‘डिलिट’ करण्यात आली. तोपर्यंत ‘लक्ष्यभेदी बाण’ कमानीतून सुटला होता. तो ‘बाण’ राष्ट्रवादीच्या अनेक निष्ठावंतांच्या जिव्हारी लागला. वेळ निघून गेल्यावर चूक सुधारण्यात काय अर्थ आहे? अशी खंत व्यक्त केली जावू लागली आहे.

काय होती वादग्रस्त पोस्ट…?

‘‘पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून भ्रष्टाचाराच्या मालिका सुरू आहेत. राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा असणारा सहभाग देखील शहरवासीयांसमोर येवू लागला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपचे वाभाडे काढण्यात राष्ट्रवादी सक्षम दिसत नाही. सध्यस्थितीत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष हे प्रसिद्धीपत्रकाद्वारे सत्ताधाऱ्यांवर निशाना साधत आहेत. मात्र, आक्रमक होवून टीका करत नसल्याने त्यांचा म्हणावा तितका प्रभाव पडताना दिसत नाही. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अनुभवी आणि जेष्ठ नेते, माजी आमदार विलास लांडे हे आक्रमक झाल्याने सत्ताधारी भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आपले आर्थिक गणित बिघडू नये, विद्यमान भाजप आमदार व भाजपची नाराजी ओढावू नये यासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी केविलवाणा प्रयत्न करत आहेत. यामुळेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी आपल्या फ्लेक्सवर माजी आमदार लांडे यांचा फोटो टाळू लागल्याचे राजकीय जाणकाराचे मत आहे.’’ अशा आशयाची ‘वादग्रस्त पोस्ट’ माजी आमदार लांडे यांनी व्हायरल केली होती. विशेष म्हणजे, ही पोस्ट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, युवा नेते पार्थ पवार या पक्षश्रेष्ठींना ‘टॅग’ करण्यात आली होती. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांत ‘करेक्ट कार्यक्रम’ झाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button