breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

इंद्रायणीनगर येथील महापालिकेच्या प्राथमिक शाळेत सुविधा पुरवा: शिवराज लांडगे

  • महापालिका शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांना निवेदन

पिंपरी | प्रतिनिधी
इंद्रायणीनगर येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक प्राथमिक सुविधांसाठी देखील अक्षरशः ताटकळत बसावे लागत असल्याची परिस्थिती आहे.याबाबत आयुक्तांनी तातडीने लक्ष घालून या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुविधा पुरवाव्यात अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे पिंपरी-चिंचवड उपाध्यक्ष शिवराज लांडगे यांनी केली आहे

याबाबत महापालिका शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, इंद्रायणीनगर प्राथमिक शाळेची सुरुवात सन २००६ मध्ये झाली. सन २०१२ मध्ये शाळेला स्वतंत्र शाळेचा दर्जा मिळाला. सध्या शाळेत बालवाडीमध्ये १३५ आणि पहिली ते सातवी पर्यंतच्या वर्गात ५३७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, आजही या शाळेला स्वतंत्र इमारत नाही. अक्षरश: पत्राशेडमध्ये शाळा भरवली जात आहे.

शाळेची मर्यादित जागा आणि वाढती पटसंख्या यामुळे इंद्रायणीनगर प्राथमिक शाळा दुबार पद्धतीने भरवली जात आहे. शाळेतील वर्गखोल्यांचा आकार लहान आहे. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच नाहीत. त्यामुळे विद्यार्थी पूर्णवेळ जमिनीवर बसतात. शाळेकडे विद्यार्थ्यांसाठी बस्करपट्ट्या देखील उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शाळेत शौचालये, युरिनरी पुरेशी उपलब्ध नाहीत. मुला मुलींची शाळा असल्याने शौचालयांच्या बाबतीत मुलीची फार कुचंबणा होते. अपुरी इमारत असल्याने शाळेत स्वतंत्र मुख्याध्यापक कार्यालय, संगणक कक्ष, प्रयोगशाळा, ई लर्निंग, रूम टू रीड, क्रीडांगण, स्टोरेज रूम आदी सुविधा नाहीत. त्यामुळे महापालिकेने पर्यायी जागा उपलब्ध करून शाळेसाठी स्वतंत्र इमारत बांधून द्यावी. तसेच विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी लांडगे यांनी केली आहे.

स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेच्या शाळेची ही अवस्था चिंताजनक आहे. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना चांगल्या सोयी-सुविधा मिळाल्या पाहिजेत. महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेवून तात्काळ कार्यवाही करावी असे देखील निवेदनात लांडगे यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button