ताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

पंतप्रधान नरेंद्र मोदींची राहुल गांधींवर टीका; “वो अब चल चुके है, वो अब आ रहे है”…

नवी दिल्लीः संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा सातवा दिवस आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर अभिनंदन प्रस्तावर सत्ताधारी-विरोधकांची चर्चा झाल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चर्चेला उत्तर दिले. “आपली ऋची, प्रवृत्ती आणि प्रकृतीनुसार प्रत्येकाने आपले म्हणणे मांडले. वेगवेगळे आकडे सादर करण्यात आले. यावरुन कुणाची किती समज आहे, त्यांचा उद्देश काय आहे, हे देखील समोर आले आहे. देश त्याची चिकित्सा करेलच. चर्चेत सहभागी झालेल्यांचे आभार मानतो.”, अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.

काल रात्री त्यांना झोप नसेल आली
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “अनेक लोकांनी आपापले आकडे दिले. काहींनी स्वतःचा तर्क मांडला. या भाषणांवरुन कुणाची किती क्षमता आहे, कुणाची किती योग्यता आणि समज आहे, हे लक्षात येते. काल काही लोकांच्या भाषणानंतर पूर्ण इकोसिस्टिम, समर्थक उड्या मारत होते. अनेकजण भाषणाचे कौतुक करत होते. कदाचित त्यांना काल रात्री चांगली झोप लागली असेल. आज कदाचित ते उठले देखील नसतील. अशा लोकांसाठी बोलले जाते, ‘ये केह केहकर हम, दिल को बेहला रहे है, वो अब चल चुके है, वो अब आ रहे है” अशा शब्दात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता टीका केली.”

तसेच राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्यावर खालच्या स्तरावर टीका करणाऱ्यांचाही समाचार मोदींनी घेतला. या सदस्यांच्या मनात जो द्वेष होता, तो टीव्हीवरच सर्व देशाला दिसला, असे मोदी म्हणाले. “मी सर्वांचे भाषण ऐकत होतो. त्यामध्ये राष्ट्रपतींच्या भाषणावर कुणाला बोलण्यात रस दिसत नव्हता. भाषणावर कुणीही चर्चा केली नाही.”, असा आरोप देखील त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी ३.४५ मिनिटांनी लोकसभा सभागृहात भाषण करण्यासाठी आले. त्यावेळी भाजपाच्या खासदारांकडून जय श्रीरामचे नारे देण्यात आले. पंतप्रधानांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला राष्ट्रपतींचे आभार मानले, तसेच देशाला एक ध्येयाकडे नेणारे भाषण दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही व्यक्त केले.

पंतप्रधानांच्या भाषणापूर्वी विरोधकांनी अदाणीच्या मुद्द्यावर जेपीसी चौकशीची मागणी केली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या मागणीवर विरोधकांना बोलू दिले नाही. यानंतर बीआरएस पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग करत असल्याची घोषणा केली.

काय म्हणाले होते राहुल गांधी?
उद्योजक गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील नाते काय, असा थेट प्रश्न करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी संसदेत हल्लाबोल केला होता. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर झालेल्या चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मोदी-अदानी यांच्यामध्ये साटेलोटे असून दोघेही एकमेकांना फायदा करून देतात. अदानींनी २० वर्षांमध्ये मोदींना व भाजपला किती पैसे दिले, असा प्रश्न गांधी यांनी विचारला. मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर जाऊन येतात आणि संरक्षण क्षेत्रातील अनेक कंत्राटे अदानींच्या कंपन्यांना मिळतात. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना देशातील उद्योगजगत त्यांच्या विरोधात होते. त्या काळात अदानी मोदींच्या पाठीशी उभे राहिले. तेव्हा त्यांचे नाते स्थानिक होते, मग गुजरातव्यापी झाले. मोदी पंतप्रधान झाल्यावर हे नाते राष्ट्रीय झाले, आता तर ते आंतरराष्ट्रीय झाले आहे, असे गांधी म्हणाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button