Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पेट्रोल, डिझेलच्या किमतींपाठापोठ दैनंदिन वस्तू, किराणा साहित्याच्या दरांमध्ये गेल्या सहा महिन्यांत उच्चांकी वाढ ‘ही’ आहेत प्रमुख कारणे!

पेट्रोल, डिझेलच्या किमतींपाठापोठ दैनंदिन वस्तू, किराणा साहित्याच्या दरांमध्ये गेल्या सहा महिन्यांत उच्चांकी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसत आहे. या महागाईमागच्या कारणांचा घेतलेला आढावा…

खाद्य तेलाचा चढता आलेख

(जून महिन्यातील दर रुपयांत)

तेलाचा प्रकार — २०१९ – २०२० -२०२२ (प्रति लिटर दर)

शेंगदाणा तेल १२० – १३० – १७०

मोहरी तेल १०२- १०८ – १६०

वनस्पती – ७५ – ९० – १२०

सोयाबीन ८५ – ९० – १४५

सूर्यफूल ९० – १०५ – १६५

पाम ऑइल ६५ – ८० – १२५

तेल वाढीची प्रमुख कारणे

भारतात दर वर्षी सरासरी एक कोटी ३० लाख टन तेलाची आयात केली जाते. यातील सूर्यफूल तेलासाठी आपण युक्रेन आणि रशियावर, तर इतर तेलांसाठी मलेशियासह मध्य आशियायी देशांवर अवलंबून आहोत. साधारपणे ८० टक्के सूर्यफूल तेल युक्रेनमधून येते. परिणामी रशिया-युक्रेनमधील लांबलेल्या युद्धाचे दूरगामी परिणाम कच्चातेलाबरोबरच खाद्यतेलाच्या किमतींवरही उमलटले आहेत. सूर्यफूल तेलाला पर्याय म्हणून पाम ऑइलची मागणी वाढली. इंडोनेशियामध्ये पाम ऑइलचे सर्वाधिक उत्पादन होते. पण तेलाचा तुटवडा लक्षात घेऊन त्यांनीही किमती वाढवल्या आहेत.

एमएसपीचा फटका डाळी, अन् तांदळाला

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी यंदा प्रमुख पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) सुमारे ५० ते ८५ टक्क्यांनी वाढ केल्याने गेल्या महिनाभरात सर्व डाळी, भात, ज्वारी, नाचणीच्या दरात वाढ झाली आहे. एकीकडे देशांतर्गत डाळींची मागणी वाढली असताना निर्यातीतही वाढ झाली आहे. डिझेल वाढीने वाहतूक खर्च महागला आहे, त्यामुळे तेलापाठोपाठ डाळीच्या किमती कडाडल्या आहेत.

डाळीचे दर (रुपयांत)

प्रकार जानेवारी २०२२ – जून अखेरीस

तूर डाळ ७५ ते ८० – १०० ते १०३

चना डाळ ६० ते ६२ – ६८ ते ७०

मूग डाळ ९० ते ९५ – १०४ ते १०४

मसूर डाळ ८५ ते ८८ – ९६ ते ९८

निर्यात वाढल्याने तांदूळ महागला

भारतीयांच्या जेवणातील प्राथमिक घटक असलेल्या तांदळाचे यंदा समाधानकारक उत्पादन झाले आहे. मात्र, आंबेमोहोर, बासमती या तांदळाला परदेशातून प्रचंड मागणी असून, निर्यात काही पटींनी वाढली आहे. परिणामी तांदळाचा देशांतर्गत तुटवडा निर्माण झाला आहे. अमेरिका व युरोपातून आंबेमोहरला, तर सौदी अरेबियातून बासमतीला सर्वाधिक मागणी आहे. घाऊक बाजारपेठेत आंबेमोहोर तांदळाचा दर ७० ते ८० रुपये किलोपर्यंत वाढला आहे. उच्च दर्जाच्या बासमतीच्या दरांत २५ टक्क्यांनी वाढ होऊन किलोचा दर ७० ते ९० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

दूध, चहा कॉफी, बिस्किटेही महागली

लॉकडाउनमध्ये दुधाची मागणी कमी झाली होती. तो भरून काढण्यासाठी विक्रेत्यांनी गेल्या वर्षभरात गाय आणि म्हशीच्या दुधाच्या दरांत लिटरमागे चार ते सहा रुपयांची वाढ केली. देशातील मोठ्या बिस्किट कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या किमती पाच ते सात टक्क्यांनी वाढवल्या आहेत. कॉफी उत्पादक कंपन्यांनी तीन ते सात टक्क्यांनी, तर नामाकिंत चहाच्या कंपन्यांनी चार ते सहा टक्क्यांनी दर वाढवले आहेत.

महागाईची प्रमुख कारणे

– रशिया-युक्रेन युद्धामुळे आयात-निर्यातीवरील बंधने

– जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती

– गेल्या सहा महिन्यांत झालेली इंधन दरवाढ

– गेल्या वर्षी लांबलेल्या पावसामुळे झालेले नुकसान

– यंदा पावसाने दिलेली ओढ

– केंद्राने पिकांच्या किमान आधारभूत किमतीत केलेली वाढ

– मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी

– निर्यात वाढल्याने व्यापाऱ्यांनी देशांतर्गत निर्माण केलेला तुटवडा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button