ताज्या घडामोडीमुंबई

सागरी किनारा मार्गाच्या दुसऱ्या बोगद्याची तयारी

मुंबई | सागरी किनारी रस्ता प्रकल्पाअंतर्गत प्रियदर्शिनी पार्क ते छोटा चौपाटी दरम्यान २.०७० किलोमीटर अंतराच्या एका बोगद्याचे खणन काम पूर्ण झाल्यानंतर आता दुसऱ्या समांतर बोगद्याची तयारी सुरू झाली आहे. त्याकरीता टीबीएम मशीनचा तब्बल १९०० मेट्रीक टन वजनाचा भाग १८० अंशात वळवण्याची कामगिरी नुकतीच पार पाडण्यात आली. येत्या एप्रिल महिन्यात दुसरा बोगदा खणण्याच्या कामालाही सुरुवात केली जाणार आहे.प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी वांदे सागरी सेतू पर्यंत पालिकेतर्फे सागरी किनारा मार्ग बांधण्यात येत आहे. या मार्गातर्गत प्रियदर्शिनी पार्क ते छोटा चौपाटी दरम्यान २.०७० किलोमीटर अंतराचे दोन बोगदे दोन्ही बाजूने बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी मरिन ड्राइव्हकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी वापरात येणाऱ्या पहिल्या बोगद्याचे खणन जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात पूर्ण झाले. त्यानंतर पालिकेच्या सागरी किनारा विभागाने आता दुसरा बोगदा खणण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

पियदर्शिनी उद्यान ते चौपाटीपर्यंत पहिला बोगदा खणण्यासाठी वापरण्यात आलेले मावळा हे अवाढव्य टीबीएम मशीन पुन्हा दुसरा बोगदा खणण्यासाठी कसे जागेवर आणणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. दुसऱ्या बोगद्याचे काम प्रियदर्शनी पार्क येथूनच सुरु करण्याचे आधी प्रस्तावित होते. मात्र, बोगदा खणणाऱ्या संयंत्राचे (टीबीएम – टनेल बोअरींग मशिन) संपूर्ण भाग सुटे करुन ते प्रियदर्शनी पार्कला नेणे, पुन्हा जोडणी करणे हे जास्त जिकीरीचे व वेळखाऊ ठरु शकते, ही बाब लक्षात घेवून, संयंत्राचे काही भाग सुटे करुन, चौपाटीवरुनच दुसऱ्या बोगद्याचे काम सुरु करण्याबाबत सल्लागारांनी अभ्यास केला. त्यानुसार आखणी करण्यात आली.

या दोन्ही बोगद्यांची लांबी ही प्रत्येकी २.०७० किलोमीटर एवढी आहे. दोन्ही बोगद्यांचा व्यास हा १२.१९ मीटर आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बोगद्याचा अंतर्गत व्यास हा प्रत्येकी ११ मीटर इतका असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button