TOP Newsपुणे

खराडीमध्ये दोन इमारतीत तब्बल 91 लाख रुपयांची वीजचोरी उघड

पुणे l प्रतिनिधी

घरगुती व वाणिज्यिक इमारतींच्या बांधकामांसाठी दिलेल्या वीजजोडण्यांची महावितरणकडून नियमित तपासणी सुरु आहे. या तपासणीमध्ये खराडी येथे बांधकाम सुरु असलेल्या गॅलेक्झी अपार्टमेंटमधील दोन इमारतींसाठी अनधिकृत केबलद्वारे थेट वीजपुरवठा घेऊन सुरु असलेली तब्बल 91 लाख 35 हजार 345 रुपयांची वीजचोरी शुक्रवारी (दि. 17) महावितरणच्या पथकाने उघडकीस आणली. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, नगररोड विभाग अंतर्गत वडगाव शेरी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिलीप मदने यांच्यासह सहायक अभियंता सचिन पुंड व अस्मिता कोष्टी तसेच जनमित्र गणेश सुरसे व विठ्ठल कोकाटे यांच्या पथकाने शुक्रवारी खराडी परिसरात बांधकाम सुरु असलेल्या काही इमारतींच्या वीजजोडण्यांची तपासणी केली. यामध्ये इऑन आयटी पार्कजवळील गॅलेक्झी वन व टू या अपार्टमेंटच्या बांधकामासाठी दिलेल्या वीजजोडणीची तपासणी करण्यात आली.

खराडी येथील रोशन रमेश दुसाने या ग्राहकाच्या नावे महावितरणकडून तीन फेज व १४ किलोवॅट क्षमतेची ही वीजजोडणी देण्यात आली आहे. पथकाच्या तपासणीमध्ये मात्र या वीजजोडणीच्या सहाय्याने आणखी 40 मीटर लांबीची एक अनधिकृत केबल टाकून गॅलेक्झी वन व टू या इमारतींसाठी विजेची मोठी चोरी सुरु असल्याचे निदर्शनास आले. या अपार्टमेंटच्या दोन्ही इमारतींचे बांधकाम पूर्णत्वास गेले असून दोन्ही इमारतींमधील सुमारे 30 फ्लॅटमधील रहिवासी, कॉमन वापरासाठी पाण्याच्या मोटर्स, दोन लिफ्टस्, पार्किंग लाईट इत्यादींसाठी वीजचोरी सुरु असल्याचे व त्यासाठी कोणतीही अधिकृत व स्वतंत्र वीजजोडणी घेतलेली नाही असे तपासणीमध्ये आढळून आले.

महावितरणने वीजचोरीच्या प्रकाराचा पंचनामा करून वीजचोरीसाठी वापरण्यात आलेली केबल व इतर साहित्य जप्त केले. पंचनाम्यानंतर अनेक फ्लॅटस्, लिफ्ट, पाण्याची मोटर व इतर कारणांसाठी एकूण 2,11,433 युनिटची म्हणजे 91 लाख 35 हजार 345 रुपयांची वीजचोरी झाल्याचे आढळून आले. गॅलेक्झी अपार्टमेंटमधील वीजचोरीच्या प्रकाराची पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार, रास्तापेठ मंडलचे अधीक्षक अभियंता प्रकाश राऊत तसेच कार्यकारी अभियंता अशोक जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली.

या वीजचोरी प्रकरणी महावितरणकडून तक्रार दाखल केल्याप्रमाणे चंदननगर पोलीस ठाण्यात वीजजोडणीधारक रोशन रमेश दुसाने या ग्राहकाविरुद्ध भारतीय विद्युत कायदा 2003 मधील कलम 135, 138 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button