breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

वीजसंकट गहिरे, कोयना वीज प्रकल्पात २० दिवसांचाच पाणीसाठा

मुंबई |

वाढत्या वीज मागणीत एकीकडे कोळसाटंचाईमुळे औष्णिक वीजनिर्मितीसमोर संकट असतानाच, वीजपुरवठ्याची सर्वाधिक भिस्त असलेल्या कोयना जलविद्युत प्रकल्पाचेदेखील राज्य सरकारी महानिर्मितीसमोर आव्हन आहे. या प्रकल्पात आता वीजनिर्मितीसाठी जेमतेम २० दिवसांचा जलसाठा उपलब्ध आहे. त्याचवेळी उरणमध्येही सध्या निम्माच वायुसाठा आहे. यामुळे राज्यावरील वीजसंकट गहिरे होत असून, भारनियमन टाळण्यासाठी महावितरणला महागड्या दराने खुल्या बाजारातून वीजखरेदी करावी लागत आहे.

राज्य सरकारी महानिर्मिती ही महावितरणला वीजपुरवठा करते. महानिर्मितीची औष्णिक वीजनिर्मिती क्षमता ९,५४० मेगावॉट आहे. पण, कोळसाटंचाईमुळे सध्या सरासरी ६,७०० ते ६,९०० मेगावॉट वीज उत्पादनच कंपनी करीत आहे. या स्थितीत कोयना जलविद्युत प्रकल्पाचा कंपनीला मोठा आधार आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पाची क्षमता १,९५६ मेगावॉट इतकी आहे. पण त्या तुलनेत कंपनी सध्या जेमतेम ५०० ते ६०० मेगावॉट वीजनिर्मिती करू शकत आहे. कोयना जलाशयात जेमतेम असलेला साठा, हे त्याचे प्रमुख कारण आहे.

ऊर्जामंत्रालयाच्या दस्तावेजानुसार, शनिवार रात्रीपर्यंत कोयना जलाशयात ५.०३ टीएमसी इतका पाणीसाठा होता. त्यापैकी दररोज किमान ०.२० टीएमसी पाण्याची वीजनिर्मितीसाठी गरज भासत आहे. त्यानुसार सध्या असलेला पाणीसाठा जेमतेम २० दिवस पुरेल इतकाच आहे. त्यातही वीजनिर्मितीसाठी अधिकाधिक ०.२० टीएमसी पाणी वापरण्याचाच नियम आहे. पण, विजेची मागणी वाढती असल्याने महानिर्मितीला मागील काही दिवसांपासून ०.२२ ते ०.२४ टीएमसी पाण्याचीही गरज भासत आहे. यानुसार एकीकडे कोळसाटंचाई असताना, कोयना जलाशयातील जलसाठ्याची स्थितीदेखील संकटातच आहे.

दुसरीकडे उरण येथील वायूआधारित वीज निर्मिती प्रकल्पदेखील महानिर्मितीसाठी महत्त्वाचा आहे. तब्बल ६७२ मेगावॉट इतकी या प्रकल्पाची क्षमता आहे. पण तेथे वायूची कमतरता आहे. त्यामुळे प्रकल्पातून दररोज सरासरी २२० ते २८० मेगावॉटच वीजनिर्मिती होत आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी दररोज किमान ३.५० दशलक्ष घन मीटर इतक्या वायूची गरज असते. पण शनिवार रात्रीपर्यंत प्रकल्पात फक्त १.५६ दशलक्ष घनमीटर इतकाच वायूसाठा शिल्लक असल्याचे ऊर्जा मंत्रालयाकडील दस्तावेजांवरुन दिसून येत आहे.

  • … तर बाहेरून वीजखरेदीची गरजच नाही

राज्यभर (मुंबई वगळून) वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीची सध्याची रोजची मागणी २४ हजार मेगावॉटदरम्यान आहे. महानिर्मितीसह अन्य सर्व स्रोतांमधील वीजपुरवठा पकडून कंपनीला २३ हजार मेगावॉटदरम्यानच वीज उपलब्ध होते. त्यामुळे महावितरणला दररोज एक हजार मेगावॉट वीज महागड्या दराने बाजारातून खरेदी करावी लागत आहे. महानिर्मितीच्या कोयना, उरण प्रकल्पातील पाणी व वायूची कमतरता नसल्यास आणि हे दोन्ही प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू राहिल्यास ही वीज महावितरणला बाहेरून खरेदी करण्याची गरज भासणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button