breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राजकारण: विधान परिषदेच्या सहा मतदारसंघांतील निवडणूक लांबणीवर!

मुंबई : विधान परिषदेच्या सहा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणूक पुरेसे मतदार नसल्याने लांबणीवर पडली आहे. यातून विधान परिषदेच्या २१ जागा आता रिक्त होणार आहेत. विधान परिषदेच्या पुणे, नांदेड, सातारा-सांगली, यवतमाळ, जळगाव भंडारा-गोंदिया या सहा मतदारसंघांतील आमदारांची मुदत डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात संपत आहे.

राज्यातील स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांचे सदस्य हे मतदार असतात. करोना तसेच ओबीसी आरक्षणाच्या मुद्दय़ावर राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका रखडल्या होत्या. काही महापालिकांची मुदत संपून अडीच वर्षे झाली. मुंबई, ठाणे, पुणे आदी महानगरपालिकांची मुदत ही गेल्या मार्चमध्ये संपली. सध्या प्रभाग रचनेच्या मुद्दय़ावर निवडणुका रखडल्या आहेत. महाविकास आघाडीने पालिकांमधील प्रभाग संख्येत वाढ केली होती. राज्यात सत्ताबदल झाल्यावर शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा प्रभागांची संख्या कमी केली होती. हा मुद्दा सध्या न्यायालयात प्रलंबित आहे.

विधान परिषद मतदारसंघातील एकूण ७५ टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधींची राजवट किंवा एकूण मतदारांच्या तुलनेत ७५ टक्के मतदार असल्यास विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक घेता येते, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच दिला आहे. या आधारे पुढील महिन्याच्या सुरुवातीला मुदत संपत असलेल्या सहा मतदारसंघांमध्ये पुरेसे मतदार नसल्याने निवडणुका लांबणीवर टाकाव्या लागत असल्याचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले. ७५ टक्के मतदार नसल्यानेच निवडणूक घेता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पुरेसे मतदार नसल्याने ठाणे, नगर आणि सोलापूरच्या आमदारांची मुदत संपूनही निवडणूक होऊ शकली नाही. परिणामी या तीन मतदारसंघांतील जागा रिक्त आहेत. विधान परिषदेच्या ७८ पैकी २२ जागा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या आहेत. सध्या तीन जागा रिक्त आहेत. आणखी सहा जागा रिक्त होणार आहेत. म्हणजेच स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील नऊ जागा आता रिक्त होतील. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्यावरच विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या नऊ जागांसाठी निवडणूक होईल.

मुदत संपणारे आमदार व त्यांचे मतदारसंघ

पुणे – अनिल भोसले (राष्ट्रवादी)

सातारा-सांगली- मोहनराव कदम (काँग्रेस)

नांदेड – अमर राजूरकर (काँग्रेस)

यवतमाळ – दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना)

जळगाव – चंदूभाई पटेल (भाजप)

भंडारा-गोंदिया – परिणय फुके (भाजप)

आधीपासून रिक्त असलेल्या जागा

१२ जागा राज्यपाल नियुक्त

ठाणे, सोलापूर, नगर स्थानिक प्राधिकारी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button