‘पशुधनाला केंद्रस्थानी ठेवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परळी वैजनाथ : “आमची माय आणि आमची माती हेच आमचे खरे प्रेम आहे. ज्याप्रमाणे शिवशंभूंच्या दर्शनापूर्वी नंदीला वंदन करण्याची आपली संस्कृती आहे, त्याच धर्तीवर पशुधनाला केंद्रस्थानी ठेवून आम्ही ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक बळकट करत आहोत. तंत्रज्ञानाच्या जोडणीतून हे क्षेत्र महाराष्ट्राला जागतिक स्तरावर दुग्ध उत्पादनात अग्रेसर करेल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
परळीतील अंबेजोगाई रस्त्यालगत ओपळे मैदानावर पशुसंवर्धन विभागातर्फे आयोजित तीन दिवसीय महा पशुधन एक्स्पोच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. याप्रसंगी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, आमदार रत्नाकर गुट्टे, पशुसंवर्धन विभागाचे सचिव (पदुम) डॉ. रामास्वामी एन, आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठम कुलगुरू डॉ. नितीन पाटील, पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे, खासगी सचिव मंदार वैद्य, अपर जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे, उपविभागीय अधिकारी अरविंद लाठकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, पशुसंवर्धन विभागाचे सह आयुक्त, बहुसंख्येने पशुपालक उपस्थित होते.
हेही वाचा – “….तर २४ लाख बेरोजगारांना रोजगार देऊ!” पंकजा मुंडे यांचे मुख्यमंत्र्यांसमोर आश्वासन…
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “हे प्रदर्शन केवळ एक सोहळा नसून कोरडवाहू शेतीतील हवामान जोखीम (Climate Risk) कमी करण्यासाठी उचललेले एक धोरणात्मक पाऊल आहे. पिकांचे नुकसान झाले तर पशुधन हेच शेतकऱ्यासाठी आधार म्हणून काम करते. त्यामुळेच आम्ही गाईला केवळ धार्मिक महत्त्व न देता तिचे आर्थिक योगदान लक्षात घेऊन ‘राज्यमाता’ असा दर्जा दिला आहे.”
दुग्ध व्यवसायातील तफावत मांडताना मुख्यमंत्री म्हणाले, “पंजाबमध्ये गाय १०-१५ लिटर दूध देते, तर आपल्याकडे २.५ लिटर ही तफावत भरून काढण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. पशुधन संवर्धन, आरोग्य व अचूक निरीक्षण आणि उत्पादकता वाढविण्यासाठी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मिशन’ चा वापर करण्यात येईल. एम्ब्रियो ट्रान्सप्लांट आणि सेक्स-सॉर्टेड सीमेन तंत्रज्ञानाद्वारे उच्च दर्जाच्या कालवडींची पैदास वाढवून दुग्धोत्पादन वाढवले जाईल. यासाठी विदर्भ- मराठवाड्यात ‘मदर्स डेअरी’ सोबत करार देखील करण्यात आला आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्राला जागतिक स्पर्धेपासून सुरक्षित ठेवले आहे. भारत- अमेरिका करारात सोयाबीन किंवा कापूस आयातीचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे बाहेरील माल येऊन भाव पडतील, या अफवांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये,” असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. याउलट भारतीय शेतकऱ्यांना अमेरिकेची मोठी बाजारपेठ आता खुली झाली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.




