breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

टायगर अभी बाकी है । माजी आमदार विलास लांडे यांची अजित पवार यांच्या राष्ट्रवादीलाच साथ!

अजित गव्हाणेंसोबत न जाण्याचा निर्णय : पुण्यातील अजित पवारांच्या बैठकीला उपस्थिती

पिंपरी । विशेष प्रतिनिधी 

माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी काल पत्रकाराना बोलताना माजी आमदार विलास लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे. आमच्या भूमिकेला त्यांचा पाठिंबा आहे, असे वक्तव्य केले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीला विलास लांडे जातीने उपस्थित राहिल्यामुळे ‘‘भोसरीतील राष्ट्रवादी संपली’’ म्हणणाऱ्यांना धक्का बसला आहे. 

राष्ट्रवादी ९० टक्के फुटली, असा दावा केला जात असतानाच संपूर्ण शहराचे नेतृत्व करु शकतील, असे नेतृत्व विलास लांडे आता राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत असल्यामुळे ‘‘टायगर अभी बाकी है’’ असा आत्मविश्वास राष्ट्रवादी अजित पवार गटातील कार्यकर्त्यांकडून बोलून दाखवला जात आहे. 

विशेष म्हणजे, अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांची महापालिकेतील कामे करावीत, शहरात सातत्याने लक्ष घालावे. तसेच, विकासकामांबाबत पाठपुरावा ठेवावा, असे आवाहनही विलास लांडे यांनी आपल्या भाषणात केले. याद्वारे ‘‘मी दादांसोबत आहे’’ असे संकेत लांडे यांनी दिल्यामुळे शहरात अजित पवार गटाचा प्रभाव कायम राहणार आहे. 

आषाढी एकादशी दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील भोसरी विधानसभा मतदारसंघातील शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष यांच्यासह माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरातील माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांची बैठक पुण्यात घेतली.

यावेळी आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर योगेश बहल, भाऊसाहेब भोईर , महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष शेखर काटे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, श्याम लांडे, शमीम पठाण, संतोष कोकणे, राजेंद्र जगताप, माया बारणे, मयूर कलाटे, अतुल शितोळे, डब्बु आसवाणी, राजू मिसाळ, प्रसाद शेट्टी, मनोज खानोलकर, उषा काळे, स्वाती काटे, कैलास बारणे, नारायण बहिरवडे, सतीश दरेकर, आशा सुर्यवंशी, सुजित पाटील, मंदा आल्हाट, रोहित काटे, राजू लोखंडे, महमद पानसरे, कळुराम पवार, अमिना पानसरे, वैशाली काळभोर, मंगला कदम, अपर्णा डोके, सुषमा तनपुरे, सारिका पवार, गोरक्ष लोखंडे, मायला खत्री, संदीप पवार, श्याम जगताप आदी पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहराध्यक्ष निवडीबाबत ‘वेट अँड वॉच’…. 

शहराध्यक्ष नवीन निवडी बाबत अध्याप निर्णय जाहीर झाला नाही. पदाधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत शहरातील सर्व माहिती घेऊन नवीन शहराध्यक्ष देण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. तसेच यावेळी महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट यांना वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुके देऊन शुभेच्छा दिल्या. नवीन शहराध्यक्ष निवडीमध्ये माजी महापौर योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्या नावाची चर्चा आहे. तसेच, विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त जागेकरिता पिंपरी-चिंचवडला संधी मिळावी, अशी मागणीही सदर बैठकीत करण्यात आली आहे. 

काल शरद पवार गटात प्रवेश, आज अजितदादांकडे हजेरी… 

काल शरद पवार गटात प्रवेश केलेल्या यादीतील माजी नगरसेवक प्रवीण भालेकर, अनुराधा गोफणे, तानाजी खाडे आणि योगेश गवळी यांचे वडील पंडीत गवळी हेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तसेच भाजपचे समर्थक माजी ज्येष्ठ नगरसेवक वसंत लोंढे हेही उपस्थित होते. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षात दाखल झालेले अजित गव्हाणे यांना खरेच आपल्या पाठीमागे ९० टक्के पदाधिकारी- कार्यकर्ते आहेत का? याचे चिंतन करावे लागणार आहे. 

२१ किंवा २२ तारखेला मेळावा…

पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गटाला सुरूंग लावण्यात शरद पवार गटाला यश मिळाले. येत्या २० जुलैला शरद पवार यांच्या उपस्थितीत विजयी संकल्प मेळावा होणार आहे. या मेळाव्यात अन्य काही लोकांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे. या मेळाव्यांनतर एक किंवा दोन दिवसांत अजित पवार यांच्या उपस्थितीत शहरात मेळावा होणार आहे. त्या ठिकाणी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला जाणार असून, पुढील दिशा निश्चित करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button