शरद पवारांचा धृतराष्ट्र झालाय! सासुरवासिनींची परंपरा ते विसरले; अजितदादांच्या महिला शिलेदराची सडकून टीका
पुणे | बारामती लोकसभा मतदारसंघात पवार काका पुतण्यामध्ये सुरू असणारा राजकीय संघर्ष आणखीन वाढताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी बारामतीमध्ये बोलत असताना “बारामतीकरांनी साहेबांना निवडून दिलं, लेकीला निवडून दिलं आता सुनेला निवडून द्यावं, बारामतीकर हे कायम पवार नावाच्या पाठीमागे उभे राहतात” असे विधान केलं होत. अजितदादांच्या या विधानाचा समाचार घेत ‘मूळचे पवार आणि बाहेरून आलेल्या पवारांमध्ये फरक आहे’ म्हणत शरद पवारांनी सुप्रिया सुळे या मूळ तर सुनेत्रा पवार या विवाहानंतर पवार झाल्याचे अप्रत्यक्षरीत्या दर्शवण्याचा प्रयत्न केला. शरद पवारांच्या विधानावर आता अजित पवार गट चांगलाच आक्रमक झाल्याचं दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या फायर ब्रँड महिला नेत्या रूपाली पाटील यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका करतानाच त्यांचा धृतराष्ट्र झाला असल्याचं म्हटलं आहे. “सासरी नांदायला आलेली सून परक्या ठिकाणाशी जन्मोजन्मीचे नाते जोडते. ते काही सहजपणे शक्य होत नाही. त्यासाठी सासरी नांदायला आलेल्या त्या मुलीच्या आतड्याला कितीदा पीळ पडतो, माहेरच्या आठवणीने जीव किती तीळ तीळ तुटतो, कितीदा ती अश्रू ढाळते हे सासरी नांदायला आलेल्या मुलीला आणि तिला नांदायला पाठवणाऱ्या बापलाच कळू शकेल. अन्य कोणालाही नाही. शरद पवार साहेब यांच्यासारख्या स्वतःची विशिष्ट प्रतिमा निर्माण करण्यात हयात घालवलेल्या नेत्याने मात्र तमाम सासुरवाशीनींचा हा त्याग मातीमोल ठरवला आहे” अशी टीका पाटील यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केली आहे.
रुपाली पाटील यांची फेसबुक पोस्ट नेमकी काय?
सासरी नांदायला आलेली सून परक्या ठिकाणाशी जन्मोजन्मीचे नाते जोडते. ते काही सहजपणे शक्य होत नाही. त्यासाठी सासरी नांदायला आलेल्या त्या मुलीच्या आतड्याला कितीदा पीळ पडतो, माहेरच्या आठवणीने जीव किती तीळ तीळ तुटतो, कितीदा ती अश्रू ढाळते हे सासरी नांदायला आलेल्या मुलीला आणि तिला नांदायला पाठवणाऱ्या बापलाच कळू शकेल. अन्य कोणालाही नाही.
शरद पवार साहेब यांच्यासारख्या स्वतःची विशिष्ट प्रतिमा निर्माण करण्यात हयात घालवलेल्या नेत्याने मात्र तमाम सासुरवाशीनींचा हा त्याग मातीमोल ठरवला आहे. सून बाहेरची असते अशा निर्देशाचे संतापजनक वक्तव्य करून तथाकथित पुरुषी मानसिकतेचे दर्शन घडवले आहे. त्यातून त्यांचेही पाय मातीचेच हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
हेही वाचा – रमजान ईदनिमित्त खासदार बारणे यांनी दिल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा!
राजकारणात स्वतःची पुरोगामी प्रतिमा निर्माण करन्यासाठी स्वतःभोवती कायम एक प्रभावळ मिरवणाऱ्या शरद पवार साहेब यांनी स्वतःच स्वतःच्या कथनी करनीतून त्या विचारांच्या यापूर्वीही अनेकदा चिंधड्या उडवल्या आहेत. मग ते राजू शेट्टींची जात काढणे असो, भाजपाने छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर खासदार म्हणून संधी दिल्यानंतर छत्रपतींच्या गादीला कमी लेखनारे अवमानजनक वक्तव्य असो, स्व. प्रभा राव या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा असताना या ज्येष्ठ महिला नेत्याबद्दल, “माणसं म्हातारी झाली की कावल्यागत करतात” हे वक्तव्य असो, की ज्येष्ठ नेते माजी मंत्री दादा जाधवराव ६९ वर्षांचे असताना त्यांच्याबद्दल तसेच स्व. सदाशिवराव मंडलिक या एकेकाळच्या स्वतःच्याच सहकाऱ्याबद्दल बोलताना “बैल म्हातारा झालाय त्याला बाजार दाखवा” असे कसाई धार्जिणे केलेले वक्तव्य असो. यातून कोणता विचार त्यांनी जपला?
एका जाहीर सभेत तर त्यांनी तृतीपंथीयांची चक्क अक्टिंग करून त्यांना देखील कमी लेखत मारलेली स्टाईल कुठल्या समतेच्या विचारधारेत बसते? त्यांच्याही लेखी हा वर्ग थट्टेचा विषय असेल तर त्यांची खरी मानसिकता काय आहे? हे दिसून आले.
सून परकी, बाहेरची अशा आशयाचे त्यांचे वक्तव्य म्हणजे शरद पवार यांचाही धृतराष्ट्र झाला आहे, हेच सिद्ध होते. कन्या प्रेमाने त्यांनी जणू स्वतःच्या डोळ्यावर पट्टीच बांधली आहे. या आंधळ्या प्रेमात मात्र त्यांनी आई, पत्नी आणि तमाम सासुरवाशींच्या, त्यागाला, त्यांनी जीव जाळून आणि मान मोडून सासरी राबत पार पाडलेल्या कर्तव्याला मातीमोल ठरवून स्वतःचेही पाय मातीचे असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
जाता जाता एक विषय. शरद पवार साहेब यांनी स्वतःचीच सून असणाऱ्या सौ. सुनेत्रा पवार यांना नजरेसमोर ठेवून तमाम सासुरवाशीनींना परकं, बाहेरचं अगदी ग्रामीण भाषेत सांगायचं म्हटलं तर उतावडं ठरवलं आहे. मात्र त्या सुनेत्रा पवार यांच्या माहेरची मुळं बारामतीच्याच मातीत आहेत. त्या अर्थाने त्यांचं माहेरही बारामती आणि सासरही बारामती. वास्तविक अशा गोष्टींची कधी राजकारणात चर्चा करायची नसते. पण तमाम महिलांचा अवमान होत असताना काही गोष्टी निदर्शनास आणून देणं आवश्यक असतं. अन्यथा आजपर्यंत खूप काही सोसलेल्या, पिचलेल्या सासुरवाशीनींचे कर्तुत्व, कर्तव्य अशा एका वक्तव्याने हकनाक निकालात निघेल.
सासरसाठी प्रसंगी प्राण अर्पण करणाऱ्या, सासरचा मान मरातब जपण्यासाठी माहेरला कायमचे, तोडणाऱ्या सासुरवाशीनींची परंपरा पवार साहेब विसरले आहेत. हे वयानुरूप झालेले विस्मरण, की त्यांचा पुरुषी मानसिकतेचा खरा चेहरा? पोटच्या लेकीच्या आंधळ्या प्रेमापोटी , लेकी समान सुनांना, शरद पवार साहेबांनी प्रचंड दुखावलेच, वेदनादायक वक्तव्य आहे. त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध.