राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची तयारी झाली, महाराष्ट्र दौऱ्याचंही नियोजन; बाळा नांदगावकरांनी दिली माहिती
मुंबई |
पुढील वर्षी राज्यात अनेक महत्त्वाच्या महानगर पालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व इतर सर्व पक्षांनी राजकीय दृष्ट्या मोट बांधायला आणि वातावरण निर्मिती करायला सुरुवात केलेली असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं देखील कंबर कसल्याचं दिसून येत आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंसोबत आज मुंबईत बैठक झाली. त्यानुसार येत्या १४ डिसेंबरपासून राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असून राज्याच्या ६ विभागांमध्ये ६ बैठका घेणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. त्यासोबतच, राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचं नियोजन पूर्ण झाल्याचं देखील ते यावेळी म्हणाले.
- पहिली बैठक १४ नोव्हेंबर रोजी…
“राज ठाकरेंची आज पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यात आगामी नगरपंचायत, नगरपरिषद आणि महानगरपालिका निवडणुकांबाबत चर्चा झाली. त्यात राज ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्याबाबतही चर्चा झाली. त्यानुसार १४ डिसेंबरला मराठवाड्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरेंची संभाजीनगर-औरंगाबादमध्ये बैठक होईल. संध्याकाळी राज ठाकरे पत्रकार परिषदेत बोलतील”, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली.
- १६ डिसेंबरला राज ठाकरे पुण्यात
मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर राज ठाकरे पुण्याला जातील, असं नांदगावकर म्हणाले. “१६ डिसेंबरला पुण्याला पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी, प्रमुख लोक, नगरसेवक अशा लोकांसोबत राज ठाकरेंची बैठक होईल. अशा ६ विभागांत ६ बैठका होणार आहेत. आत्ता दोन बैठकांच्या तारखा ठरल्या आहेत”, असं ते म्हणाले.
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रानंतर कोकण विभागात राज ठाकरे जाणार असून तिथली बैठक रत्नागिरीत होईल, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली. मात्र, ही बैठक नेमकी किती तारखेला होईल, याविषयी अंतिम निर्णय व्हायचा असल्याचं ते म्हणाले.
- अयोध्या दौरा कधी?
दरम्यान, राज ठाकरेंच्या आगामी अयोध्या दौऱ्याविषयी देखील बाळा नांदगावकर यांनी यावेळी माहिती दिली. “महाराष्ट्राच्या सहा विभागात राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका होणार आहेत. त्या वेळापत्रकानुसार त्यांचा अयोध्येला जाण्याचाही निर्णय झाला आहे. ती तारीख अद्याप ठरलेली नाही. पण आमची अयोध्या दौऱ्याची तयारी झाली आहे”, असं ते म्हणाले.