महाराष्ट्रात ९६ लाख खोटे मतदार..; राज ठाकरेंचा गंभीर आरोप

Raj Thackray | मुंबईमधील गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे आज (१९ ऑक्टोबर) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर टीका केली. तसंच महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने ९६ लाख खोटे मतदार याद्यांमध्ये भरण्यात आले आहेत असा गंभीर आरोपही त्यांनी केला. माझ्याकडे याबाबतची खात्रीलायक माहिती असल्याचा दावा राज ठाकरेंनी केला.
राज ठाकरे म्हणाले, की मी तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो. दिवाळीच्या मध्यात आपण आज हा मेळावा आयोजित केला आहे. हा तातडीचा मेळावा आहे. यावेळची निवडणूक आपण ठरवू तेव्हा लागेल. मतदार याद्यांचा गोंधळ आत्ताचा नाही. हा गेल्या काही वर्षांचा आहे. २०१६-२०१७ ला मी व्होटिंग मशीन आणि मतदार याद्यांच्या विरोधात आवाज उठवला होता. एमआयजी क्लबमध्ये ती पत्रकार परिषद झाली होती. त्यावेळी अनेकांना मी जे बोललो त्याचं गांभीर्य कळलं नव्हतं. प्रत्येकाच्या दरवाजावर टकटक झाली तेव्हा कळलं की काय प्रकार चालले आहेत.
हेही वाचा : ओबीसींचं आरक्षण जाणार आहे याचा पुरावा कुठे? राधाकृष्ण विखे पाटील यांचा ओबीसी नेत्यांना सवाल
आत्ताही विधानसभेची निवडणूक झाली २३२ आमदार निवडून आले आहेत. एवढं प्रचंड यश मिळूनही महाराष्ट्रात सन्नाटा होता. मतदार तर आवाक झालेच होते पण निवडून आलेलेही आवाक झाले होते. कारण त्यांनाही कळलं नाही कसा निवडून आलो. मग सगळ्यांनाच समजलं की निवडणुका कशा प्रकारे चालल्या आहेत. कसे विजय मिळतात, कसं यश मिळतं ते कळलं. राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण मतांमध्ये रुपांतर होत नाहीत असं अनेक जण म्हणतात. असं केलं तर कशी काय मिळेल मतं? मला तर कळलं आहे की आत्ताच्या निवडणुकांसाठी १ जुलैला निवडणुकांसाठी यादी बंद केली आहे. जवळपास ९६ लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरले आहेत. मुंबईत ८ ते साडेआठ लाख मतदार, ठाण्यात, पुण्यात अशा प्रत्येक ठिकाणी भरले आहेत. अशा निवडणुका होणार आहेत तर मग प्रचार कशाला करायचा? असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे. तुम्ही मतं द्या किंवा नका देऊ मॅच फिक्स झाली आहे. अशा प्रकारे निवडणुका होणार का? ही कोणती लोकशाही आहे? असंही राज ठाकरे म्हणाले.




