मकोका लागला तरी वाल्मिक कराडच्या हातात बेड्या का नाहीत ?
गृहविभाग, पोलिस प्रशासन तसेच कायदेतज्ञांनी सांगावे कराडच्या हातात ...

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या होऊन महिन्याभरापेक्षा जास्त कालावधी झालाय. या प्रकरणात आरोपींना अटक सुद्धा झालीय. पण न्याय मिळण्याबाबत अजूनही मनात संशय आहे. म्हणून सातत्याने तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक SIT ची स्थापना करण्यात आली. त्या SIT मधील अधिकारी बदलण्यात आले. वाल्मिक कराडसोबतचे काही अधिकाऱ्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे तपासाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण होणं स्वाभाविक आहे. संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. वाल्मिक कराड हाच या हत्येमागचा मुख्य मास्टर माइंड असल्याचा आरोप होतोय. पण त्याला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा विरोधी पक्षांचा आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचा आरोप आहे.
वाल्मिक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा मित्र आहे. मुंडे यांचा निकटवर्तीय असल्यामुळे वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न होतोय. त्याला तुरुंगातही कैद्यासारखी वागणूक मिळत नसल्याचे आरोप होत आहेत. आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी X वर दोन पोस्ट केल्या आहेत. याद्वारे त्यांनी काही प्रश्न विचारले आहेत.
मला आलेल्या मेसेज मधे एका सामान्य नागरिकाच्या मनातील भावना
खंडणी(३०७), हत्या(३०२), संघटित गुन्हेगारी (मकोका) मध्ये गुन्हेगार असलेल्या, १४ दिवसांपासून आरोपी म्हणून तुरुंगात असणाऱ्या वाल्मिक कराडच्या हातात बेड्या का नाहीत ?पोलीस वाल्मिक कराडला आरोपी/गुन्हेगाराची वागणूक न देता एखादी वीआयपी सुरक्षा दिल्यासारखी का दिसत आहे ? गृहविभाग, पोलिस प्रशासन तसेच कायदेतज्ञांनी सांगावे कराडच्या हातात बेड्या का नाहीत.सारखेच गुन्हे असलेले घुले, चाटे, सांगळे यांना बेड्या घालून वागणूक आहे पण वाल्मीक कराडला नाही. कराडच्या हातात बेड्या न घालण्याचे कारण काय ?
वाल्मीकची दहशत कि मंत्री धनंजय मुंडेचा दबाव ?
असे प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केले आहेत. काल वाल्मिक कराडच्या सुटकेसाठी परळी पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन झाले. वाल्मिक कराडची 75 वर्षीय आई अन्न-पाण्याचा त्याग करुन आंदोलनाला बसली होती. मकोका लावल्यानंतर त्याच्या समर्थकांनी परळी बंद केली. काहींनी स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.