ईडीच्या कारवाईवरून केशव उपाध्येंचा शरद पवारांवर निशाणा; म्हणाले,“स्वतः सत्तेत असल्यानं..”
मुंबई |
गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाच्या काही सदस्यांवर ईडीकडून कारवाई केली जात आहे. सत्तेसाठी आणि बदल्याच्या भावनेतून ही, कारवाई होत असल्याची टीका सत्ताधाऱ्यांकडून केली जात आहे. कारवाई होत असलेल्या नेत्यांमध्ये अनिल देशमुख, भावना गवळी, प्रताप सरनाईक यांचा समावेश आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षात यावरून खडाजंगी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील प्रतिक्रिया दिली होती. शरद पवार यांनी एकाचवेळी ‘ईडी’च्या इतक्या कारवाया याआधी कधी पाहिल्या होत्या का? असा सवाल करत ईडीच्या कारवाया म्हणजे राज्यांच्या अधिकारांवर गदा आहे, असं म्हटलं होतं. यावर उत्तर देत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पवारांवर निशाणा साधलाय.
“पुर्वी तुम्हीच सत्तेत होता त्यामुळे तुम्ही काहीही केलं, कोणतीही भानगड केली, तरी तुमच्यावर ईडी कारवाई कशाला करेल, असा सवाल उपाध्ये यांनी केला. तसेच स्वतः सत्तेत असल्याने सगळं बिनदिक्कत, कोणत्याही भीतीशिवाय सुरू होतं. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे तुमच्यावर कारवाई होत आहे. यापुढे अशा भानगडी चालणार नाहीत,” असं केशव उपाध्ये म्हणाले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष @PawarSpeaks म्हणतात एकाचवेळी 'ईडी'च्या इतक्या कारवाया याआधी कधी पाहिल्या होत्या का?
पूर्वीच्याकाळी भानगडी करणारेच सरकारमध्ये असतील तरकशाला ईडी कारवाई करेल? बिनदिक्कत सुरू होत कारण सैयां भये कोतवाल, अब डर काहे का?
आतापरिस्थिती बदलली त्यामुळे कारवाया होत आहेत— Keshav Upadhye (@keshavupadhye) September 7, 2021
- काय म्हणाले होते शरद पवार…
“महाराष्ट्रात इतक्या वर्षांत इतक्या ईडीच्या केसेस कधी ऐकल्या आहेत का तुम्ही? खडसे, अनिल देशमुख, प्रताप सरनाईक अशा अनेक जणांच्या विरोधात केसेस आहेत. हल्ली विरोधकांना त्रास देण्यासाठी याचा साधन म्हणून वापर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ठीक आहे. काही काळ येतो, नंतर जातो. जेव्हा हा काळ जाईल, तेव्हा यात दुरुस्त्या होतील”, असं शरद पवार म्हणाले होते. तसेच “जिथे गैरव्यवहार झाला असेल, त्यासाठी आपल्या देशात कमिशन आहेत. त्याच्याकडे तक्रार केली जाऊ शकते. राज्य सरकारचं गृह खातं आहे. इथे तपासाची यंत्रणा असताना ईडीनं त्या संस्थांमध्ये जाऊन हस्तक्षेप करणं हे एका अर्थानं राज्यांच्या अधिकारांवर गदा आणणं आहे. याची अनेक उदाहरणं हल्ली ऐकायला मिळत आहेत. या गोष्टी मला योग्य वाटत नाही. जेव्हा संसदेचं अधिवेशन सुरू होईल, तेव्हा या गोष्टी मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू”, असं शरद पवार म्हणाले होते.