भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे सध्या 6 दिवसांच्या ब्रिटन आणि आयर्लंड दौऱ्यावर
लंडनमधील चॅथम हाऊसमध्ये परराष्ट्रमंत्री जयशंकर यांना काश्मीर प्रश्नावर प्रश्न

लंडन : भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे सध्या 6 दिवसांच्या ब्रिटन आणि आयर्लंड दौऱ्यावर आहेत. येथे ते अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेत असून काही कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. काल लंडनमधील एका कार्यक्रमात काश्मीरबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी भारताची संपूर्ण योजना सांगितली. ही योजना ऐकून पाकिस्तानचा जळफळाट तर नक्की होणार. लंडनमधील चॅथम हाऊसमध्ये परराष्ट्रमंत्री जयशंकर यांना काश्मीर प्रश्नावर प्रश्न विचारण्यात आला . पाकव्याप्त काश्मीर (पीओके) परत घेतल्याने काश्मीर प्रश्न पूर्णपणे सोडवला जाईल, असे ते म्हणाले.
काय आहे जयशंकर यांचा प्लान ?
काश्मीर प्रश्नावर परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी त्यांचा प्लान सांगितला. ते म्हणाले की, आम्ही टप्प्याटप्प्याने काम करत आहोत. काश्मीरमध्ये आम्ही बहुतेक समस्या सोडवण्यामध्ये चांगले काम केले आहे. कलम 370 हटवणे हे एक पाऊल होते असे मला वाटते. त्यानंतर, दुसरी पायरी म्हणजे काश्मीरमधील विकास, आर्थिक क्रियाकलाप आणि सामाजिक न्याय पुनर्संचयित करणे, असे ते म्हणाले. सरकारच्या या प्लानमुळे काश्मीरमध्ये बरेच बदल पहायला मिळाले आहेत. तर तिसरी पायरी म्हणजे 370 नंतर काश्मीरमध्ये निवडणुका घेणे, ज्यामध्ये खूप जास्त मतदान झाले, असे त्यांनी नमूद केलं.
हेही वाचा : शिक्षण विश्व: निवेदन-सूत्रसंचालन कार्यशाळा उत्साहात
मला वाटतं की आपण काश्मीरचा तो भाग परत येण्याची वाट पाहत आहोत, जो बेकायदेशीर पाकिस्तानच्या ताब्यात आहे. तो हिस्सा भारताकडे परत येताच जम्मू-काश्मीरमध्ये पूर्णपणे शांतता स्थापित होईल, असे मोठे विधान परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केलं.
ब्रिटनच्या पंतप्रधानांची घेतली भेट
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी संध्याकाळी लंडनमध्ये ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची भेट घेतली. दोघांमध्ये द्विपक्षीय सहकार्य आणि रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा झाली. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांच्या X हँडलवर या बैठकीची छायाचित्रे शेअर केली आहेत. दोघांमध्ये द्विपक्षीय सहकार्य आणि रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा झाली.