breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रियलेखव्यापारसंपादकीयसंपादकीय विभाग

‘आयटी हब’मुळे जगाच्या नकाशावर आलेली हिंजवडी अन्‌ शरद पवार यांची दूरदृष्टी!

विशेष संपादकीय : एक निर्णय अन्‌ पिंपरी-चिंचवडमधील भूमिपुत्रांचे भाग्य उजळले!

राजकीय दूरदृष्टी असेल तर एखाद्या प्रकल्पामुळे त्या परिसराचा कसा कायापालट होऊ शकतो? हे पहायचे असेल तर पुण्यात दोन उदाहरणे हमखास डोळ्यांसमोर येतात. एक म्हणजे बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी क्रिडानगरी आणि दुसरं म्हणजे हिंजवडी येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्क अर्थात आयटी इंडस्ट्री..!

– श्री. विजय जगताप, ज्येष्ठ पत्रकार, लेखक संशोधक. 

1992 मध्ये क्रिडानगरी उभारणीस सुरुवात झालीआणि अवघ्या दोन वर्षांत म्हणजे 1994 साली राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा येथे पार पडल्या. अथलेटिक्सपासून जलतरण अशा 17 विविध क्रीडा प्रकार असलेल्या खेळांच्या स्पर्धा एकाच परिसरात होण्यासाठी उभारलेल्या या क्रिडानगरीने पुण्याचे नाव देशभर पोहोचविले. त्यानंतरच्या पुढील चारच वर्षात 1998 मध्ये राज्यात सत्तेवर असलेल्या तत्कालीन महायुती सरकारने आयटी इंडस्ट्रीचा पाया रोवला. याच सरकारने विशेष आर्थिक क्षेत्राच्या (सेझ) अंमलबजावणीस सुरुवात करीत ‘एमआयडीसी’ला अधिकार देत स्वातंत्र्य दिले. 1999 ला मात्र राज्यात सत्तांतर झाले आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर आले.

‘‘दूरदृष्टीचे नेते’’ अशी ओळख असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या पश्चिमेची बाजू असलेल्या तेव्हाच्या ओसाड व मोकळ्या भागामध्ये आयटीनगरी उभी करता येईल, असा संकल्प केला होता. त्याच दरम्यान ताथवडे गावचे भूमिपूत्र असलेल्या तत्कालीन खासदार विदुरा नवले यांनी हाकेच्या अंतरावर असलेल्या हिंजवडी गावच्या वेशीवर साखर कारखाना (संत तुकाराम सहकारी साखर कारखाना) उभा करण्यासाठी शदर पवार यांना भूमिपूजनासाठी निमंत्रित केले. साखर कारखान्यासाठी पवारांनी भूमिपूजन त्यांनी केले खरे मात्र ही जागा आयटी पार्कसाठी अधिक उपयुक्त असल्याचे आपल्या भाषणात नमून करून साखर कारखाना अन्य जागेत उभारावा, अशी सूचना केली. पवार साहेबांची सूचना सर्वांनी मान्य केली आणि काही दिवसांतच ‘एमआयडीसी’ने आयटी पार्क विकसित करण्याच्या कामाला सुरुवात केली.

हिंजवडीच्या परिसरात माजी खासदार नानासाहेब नवले यांनी साखर कारखान्याची जागा सॉफ्टवेअर पार्कसाठी देऊ करण्याचा एक निर्णय घेतला. पण, त्या निर्णयामुळे आज किमान दोन लाख कोटी रुपयांची उलाढाल या परिसरात होत आहे, याचे श्रेय शरद पवार यांना द्यावे लागेल.

हिंजवडी, माण या प्रमुख गावातील 2800 एकर क्षेत्र संकलित करत 155 कोटी रुपये खर्चून राजीव गांधी इन्फोटेक पार्क 2003 साली खऱ्या अर्थाने आयटी इंडस्ट्रीला सुरुवात झाली. हाकेच्या अंतरावर असलेल्या मुंबई-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग, पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग, चिकटून असलेले पिंपरी-चिंचवड शहर आणि १५ मिनिटांवर असलेले पुणे शहर यामुळे दळण-वळण सुविधा व भौगोलिक परिसराचा झालेला विकास यामुळे डोळे दिपून जावेत व रातोरात चमत्कार घडावा, तसे हिंजवडीचे बाह्य व आंतर रुप पालटून गेले.

हिंजवडी आयटी पार्कच्या पहिल्या टप्प्यात जगातील सर्वात मोठ्या कंपन्या म्हणून आयटी इंडस्ट्रित बोलबाला असलेल्या इन्फोसिस, विप्रो, टाटा कन्स्लटन्सी, अमॅडॉक्स, कॉग्निझंट यांची कॉर्पोरेट कार्यालये सुरू झाली. प्रशस्त व सुंदर अंतर्गत रस्ते, सुशोभिकरण केलेले चौक व पदपथ, पंचतारांकित सुविधा असलेली हॉटेल्स येथे सुरू झाल्याने राज्यातील प्रमुख आयटी पार्क असलेला परिसर म्हणून हिंजवडी जगाच्या नकाशावर आले. पिंपरी-चिंचवड शहराच्या लगत असलेला हा आयटी पार्क देश-विदेशातील नोकऱ्यांचे ‘केंद्रबिंदू’ बनला. औद्योगिक शहर असलेल्या या पिंपरी-चिंचवडला ‘आयटी हब’ म्हणून जगमान्यता मिळाली, यामागे शरद पवार यांची दूरदृष्टी कारणीभूत ठरली आहे.

याचा संपूर्ण फायदा येथील भूमिपुत्रांना झाला. जमिनींना सोन्याचा भाव आला आणि एकेकाळी शेतावर राबणारा इथला स्थानिक भूमिपूत्र आज आलिशान गाड्यांमध्ये फिरतो आहे. तसेच, उद्योग व्यावसायात स्थिरावला आहे. यामुळे आजही शरद पवार यांच्या नेतृत्त्वार विश्वास असलेली नवी पिढी पिंपरी-चिंचवडच्या आधुनिक प्रगतीचे ‘सारथी’ म्हणून शरद पवार यांच्यामागे ठामपणे असलेली दिसते.

चांगली माणसं आणि चांगलं वातावरण लाभलं, तर कुणाच्याही जीवनात व व्यक्तिमत्त्वात अमुलाग्र बदल होतो. असे म्हणतात. एका आयटी पार्कमुळे हिंजवडीकरांचे आयुष्य बदलून गेले. राज्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायतीचा मान दोनच वर्षात हिंजवडी ग्रामपंचायतीने मिळविला. सुदैवाने 2002 साली मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे सुरू झाल्याने पाचही बोटे तुपात अशा प्रकारे येथील आयटी कंपन्यांना कनेक्टिव्हिटी लाभली. मागील 23 वर्षात आयटी क्षेत्राचे रुप बदलून टाकणाऱ्या हिंजवडी पुढे आव्हानांची व संकटांची नवी मालिकादेखील आता उभी राहिली आहे. त्यापैकी सर्वात मोठी समस्या म्हणजे वाहतूकीची आहे. तब्बल 139 कंपन्या येथे असल्याने सव्वा दोन लाख कर्मचारी नोकरीनिमित्ताने येथे ये-जा करतात. परंतु, त्यांच्यावर अवलंबून असलेल्या सेवा, उद्योग देणाऱ्या अन्य पाच लाख लोकांची दैनंदिन वर्दळ येथे आजमितीस सातत्याने सुरू आहे.

‘एमआयडीसी’ने तिसऱ्या टप्प्यात बायोटेक्नॉलॉजी उद्योगांची उभारणी केल्याने हिंजवीच्या यश आणि किर्तीमध्ये वाढच झाल्याचे पहावयास मिळते आहे. याच जोडीला आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव असलेल्या शैक्षणिक संस्थाचे जाळेदेखील येथे उभे राहिले आहे. 2016 साली भारत सरकारने स्मार्ट शहरांच्या विकासासाठी जी प्रस्तापित शहरे व ठिकाणे यांची निवड केली त्यामध्ये हिंजवडीची निवड होण्याबरोबरच ‘पीएमआरडीए’ने हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाची देखील उभारणी करण्याचे काम हाती घेऊन युद्धपातळीवर ते सध्या सुरू आहे.

एखाद्या पायाभूत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा फायदा आजूबाजूच्या परिसरावर फार विलक्षण गतीने होत असतो. त्यानुसार पिंपरी-चिंचवड हद्दीतील वाकड, पुनावळे व रावेत या तीन गावांचे रुप बदलून टाकण्यास हिंजवडी आयटीचे मोठे अप्रत्यक्षरुपी योगदान लाभले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने निर्माण केलेल्या पायाभूत सुविधा, बीआरटी रोड, रस्ते व पुलांचे निर्माण केलेले जाळे आजही आता पीएमआरडी उभारत असलेला रिंगरोड हा शहराच्या विकासाला हातभार लावणारा ठरणार आहे. मात्र, या विकासाचा पाया शरद पवार यांनी रचला, हे निश्चित…!

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button