Ground Report । राष्ट्रवादीत सरंमजामशाही : शहराध्यक्ष तुषार कामठेंना उशीरा जाग अन् अजित गव्हाणे टीमने फिरवली पाठ!
शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांचे वक्तव्य अखेर खरे ठरले : लोकसभेतील जादुमुळेच अन् विधानसभेसाठी ‘आयाराम’ वाढले

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन पुण्यातील बालेवाडी स्टेडिअमवर झाले. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ‘‘भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार’’ असा उल्लेख करीत टीका केली. याचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले.
पिंपरी-चिंचवडमधील माजी आमदार विलास लांडे यांनी थेट पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिले. ‘‘शरद पवार यांच्यावर टीका किंवा आरोप केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसले..’’ अशी सूचनाही केली. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आण्णा बनसोडे यांनी ‘‘शरद पवारांवरील टीका योग्य नाही’’ असे जाहीरपणे भूमिका मांडली.
संपूर्ण राज्यात शरद पवार यांच्यावरील टीकेवरुन निषेध व्यक्त हाते असताना, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांना शहराबाहेर असल्यामुळे निषेध किंवा आंदोलन करता आले नाही. दुसऱ्या दिवशी कामठे यांनी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने केली. ‘‘देर आये दुरूस्त आये’’ असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यानंतर, केंद्रीय अर्थसंकल्प पाहणी अहवाल अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी संसदेत जाहीर केला. सर्वसामान्यांच्या जीवनाशी संबंधित असलेल्या अर्थसंकल्पातील आक्षेप आणि त्रुटींबाबत पुन्हा शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने केली. मात्र, ही दोन्ही आंदोलने वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहेत.
टीम गव्हाणेंवर निष्ठावंत कार्यकर्त्यांची नाराजी…
आगामी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत एकूण २८ पदाधिकारी- माजी नगरसेवक होते, असा दावा केला जातो. गव्हाणे यांच्या प्रवेशामुळे पक्षात दोन मतप्रवाह आहेत. खासदार अमोल कोल्हे स्वत: या पक्षप्रवेशावर नाराज आहेत. ‘‘भोसरीतील परिस्थिती अध्यक्षांना माहिती नाही’’ असे म्हणत त्यांनी आपली खंत शरद पवार यांच्यासमोर जाहीर व्यासपीठावर बोलून दाखवली आहे. आता पक्षात आलेले केवळ लोकसभेतील पवार साहेबांच्या जादुमुळे आहेत, विधानसभा निवडणुकीसाठी आले आहेत, अशी खासदार कोल्हे यांनी भावना आहे. विचार, निष्ठा आणि अस्मिता याबाबत त्यांना काहीही देणे-घेणे नाही, असा थेट आरोप त्यांनी केला होता. महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचा आणि दिल्लीश्वरांशी भिडणारा नेता शरद पवार यांच्यावर टीका केल्यामुळे राष्ट्रवादीने आंदोलन केले. त्या आंदोलनाला टीम-गव्हाणे उपस्थित नव्हती. त्यानंतर अर्थसंकल्पाबाबत आंदोलन झाले त्यावेळीही टीम-गव्हाणे यांनी त्याकडे पाठ फिरवली. विधानसभा निवडणुकीसाठी भेटी-गाठींचा सपाटा लावलेल्या अजित गव्हाणे यांना पक्षाच्या आंदोलनांसाठी वेळ नाही का? अजित पवार यांच्या पक्षात ज्याप्रमाणे वतनदारी, सरंजामशाही सुरू आहे, त्यामधून गव्हाणे बाहेर येणार आहेत का? गव्हाणे यांच्या प्रवेशामुळे शहरात शरद पवार गटाची ताकद वाढल्याचे दिसणार आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने निष्ठवंत कार्यकर्त्यांकडून उपस्थित केले जात आहेत.