Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘गरिबांसाठी सक्षम आरोग्य व्यवस्था उभारण्यावर शासनाचा भर’; मंत्री हसन मुश्रीफ

सांगली  : वैद्यकीय शिक्षण विभागाची जबाबदारी स्वीकारल्यापासून मिरज व सांगलीच्या शासकीय रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे. सामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयाचा खर्च परवडत नाही. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना दर्जेदार उपचार मिळावेत आणि त्यांना खासगी रुग्णालयात जाण्याची गरज पडू नये, हीच शासनाची भूमिका असून राज्यामध्ये शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय सेवा बळकट करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथील मॉड्युलर आय.सी.यु. चे लोकार्पण व केंद्र पुरस्कृत ईडब्ल्यूएस (EWS) योजनेअंतर्गत लेक्चर हॉल व वसतिगृहांच्या कामांचे भूमिपूजन, तसेच पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथील मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. या अनुषंगाने पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार इद्रिस नायकवडी, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, उपअधिष्ठाता डॉ. श्रीकांत अहंकारी, वैद्यकीय उपअधिक्षक डॉ. रूपेश शिंदे आदि उपस्थित होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, सांगली सिव्हील हॉस्पिटलमध्ये राज्य शासनाच्या निधीमधून सात मॉड्युलर ऑपरेशन थिएटर मंजूर करण्यात आले. त्यातील 5 मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचे लोकार्पण करण्यात आले. त्यासाठी राज्य शासनाने सुमारे २० कोटी रूपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. याचा गोरगरीब रूग्णांना फायदा होणार आहे. मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 40 बेडचा मॉड्युलर आयसीयु राज्य शासनाच्या निधीतून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे मोफत तसेच कमी पैशांमध्ये वैद्यकीय सुविधा देणे शक्य झाले आहे. राज्य शासनाने राज्यात पहिली डिजिटल ब्रेन अंन्जीओग्राफी मशीन मिरज मध्ये मंजूर करून सुरू केली आहे. त्यामुळे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करणे सोपे झाले आहे. याशिवाय रुग्णालयात लिथोट्रिप्सी, आधुनिक लॅप्रोस्कोपी, इको व सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ३ टेस्ला एमआरआय मशीनमुळे आतापर्यंत १५ हजारांहून अधिक रुग्णांना लाभ झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  ‘घटनात्मक पायाभरणीमुळे भारताची लोकशाही सशक्त’; राज्यपाल जिष्णु देव वर्मा

शासकीय रूग्णालय मिरज येथे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी २५० क्षमतेचे चार लेक्चर हॉल, पाच प्रॅक्टिकल हॉल तसेच मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहांची उभारणी करण्यात येत असल्याचे सांगून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, विद्यार्थ्यांचे शिक्षण दर्जेदार व्हावे यासाठी हॉस्टेल, स्टडी रूम, परीक्षा हॉल यांसारख्या सुविधांवर विशेष भर देण्यात येत आहे. 100 विद्यार्थी क्षमतेचे बीऐस्सी नर्सिंग कॉलेज मंजूर झाले असून लवकरच त्यांचे बांधकाम सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी शासनाने निधीची तरतूद केली आहे. सांगली व मिरज रूग्णालयामध्ये भुयारी गटार तसेच एसटीपी प्लॅन्टसाठी 25 करोड रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मिरज सिव्हीलचे काम येत्या दोन महिन्यात पूर्ण होईल. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार वसतिगृह तसेच रूग्णालयाचे नुतनीकरण करणे गरजेचे होते. त्यासाठी 17 कोटी रूपये निधी दिल्याने काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याचे ते यावेळी म्हणाले.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, राज्यात सध्या ३६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये कार्यरत असून नव्याने १० महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. यामुळे सुमारे १००० एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. जपानच्या ‘जायका’ बँकेकडून सुमारे ४००० कोटी रुपयांचे कर्ज मिळणार असून त्यातून नवीन महाविद्यालये व नर्सिंग शिक्षणाचा विस्तार होणार आहे. मिरज येथे कॅन्सर उपचारांसाठी L3 स्तराची सुविधा विकसित करण्यात येणार असून केमोथेरपी व रेडिएशन सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. तसेच पीपीपी तत्त्वावर कॅथलॅब उभारून बायपास व अँजिओप्लास्टीसारख्या शस्त्रक्रिया सुरू करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. रूग्णालयातील परिसर स्वच्छ व सुंदर राहील याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. सांगली, मिरज रूग्णालयात रोबोटिक सर्जरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न करण्यात येतील, असे ते यावेळी म्हणाले.

यावेळी आमदार सुधीर गाडगीळ व आमदार इद्रिस नायकवडी यांनी मनोगत व्यक्त करून आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी विविध मागण्या केल्या.

प्रारंभी शासकीय रूग्णालय मिरज येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस मंत्री मुश्रीफ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

प्रास्ताविक वैद्यकीय उपअधिक्षक डॉ. रूपेश शिंदे यांनी केले. आभार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी मानले.

या कार्यक्रमास शासकीय रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button