शहराच्या विकासासाठी पुन्हा संधी द्या; उपमुख्यमंत्री अजित पवार
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातूनच

महापालिका निवडणुका होईपर्यंत पालिकेचा कारभार हर्डीकर यांच्याकडेच; पालकमंत्र्यांनी केले स्पष्ट
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरामध्ये 1992 ते 2017 या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून एकहाती कारभार केला. पाण्याचे व्यवस्थापन, रस्ते, उड्डाणपूल उभारून शहराचा विकास केला. त्यामुळे नागरिकांनी पुन्हा संधी द्यावी असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांनी बुधवारी केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना महायुतीच्या माध्यमातूनच सामोरे जाण्याची अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली चिंचवड येथे आज जनतेच्या स्थानिक तक्रारींवर थेट तोडगा काढण्यासाठी ‘जनसंवाद’ कार्यक्रम संपन्न झाला. चिंचवडमधील या उपक्रमात आज सुमारे ३ हजार तक्रारी नोंदविण्यात आल्या, त्यापैकी तब्बल १२०० तक्रारींचे निराकरण तत्काळ करण्यात आले. इतर प्रकरणांवर संबंधित विभागांकडून कार्यवाही सुरू आहे.
यानंतर माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना शहरात चांगली कामे केली. त्यामुळे पुन्हा संधी द्यावी, आता आम्ही महायुतीमध्ये आहोत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती असावी आमची अपेक्षा आहे.’ पवार पुढे म्हणाले.
माझ्या नेतृत्वाखाली सहकाऱ्यांनी १९९२ पासून २०१७पर्यंत पिंपरी-चिंचवड महापालिकेत चांगले काम केले. त्यावेळी अनेक वर्षे विरोधी पक्षनेता कोण असावा, हे देखील मीच ठरवत होतो. विरोधकांना विश्वासात घेऊन निर्णय घेत होतो. खेळीमेळीच्या वातावरणात महापालिकेचे कामकाज केले. टोकाचे मतभेद निर्माण होऊ दिले नाहीत. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची देखील कामे केली आहेत. तसेच ‘भामा आसखेड, आंध्र धरणातील पाणी आरक्षित केले. पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प नियोजित केले. शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प सुरू करून पाणी आणावे लागणार आहे,’ असेही ते म्हणाले. हिंजवडीतील कामांना गती दिली आहे. बेशिस्त अवजड वाहनांवर कारवाईच्या सूचना दिल्या जातील, असे पवार यांनी सांगितले.
हेही वाचा : “..तर इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा”; उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला टोला
तत्पूर्वी पवार यांनी कुंजीर चौक, पिंपळे सौदागर परिसरातील वाहतूक आणि रस्ते समस्यांचा सविस्तर आढावा घेतला. अतिक्रमण, पार्किंग व महावितरण संबंधित तक्रारींबाबत तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले. नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.
फुटपाथवर कोणाचीही गाडी असेल थेट उचला
पदपथावर वाहने उभी केली जातात. त्यामुळे कोंडीत भर पडते. कोणी दमदाटी केली तर कोणाचे ऐकायचे नाही. कोणाचीही मोटार, वाहने उभी केली असली तरी कारवाई करावी. आम्ही लावलेली वाहने असली तरी उचलावीत असे निर्देश अजित पवार यांनी दिले. गृहनिर्माण सोसायटी, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात घर मिळण्यास विलंब होणे असे विविध प्रश्न घेऊन नागरिक जनसंवादमध्ये आले आहेत. अजित पवार संबंधित अधिकाऱ्यांना व्यासपीठावर बोलावून घेत प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश देत आहेत.
पालिकेच्या कर्जासंदर्भात वस्तुस्थिती तपासा
महापालिकेने विविध कामासाठी कर्जरोखे उभारले आहे. महापालिकेला कर्जबाजारी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे याची वस्तुस्थिती तपासण्याची सूचना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
महापालिका निवडणुकीनंतर नवीन आयुक्त
महापालिकेचे आयुक्त असलेले शेखर सिंह यांची राज्य शासनाने बदली केली. त्यांच्याकडे नाशिक कुंभमेळ्याची जबाबदारी दिली आहे. महापालिकेचे आयुक्त म्हणून काम केलेले महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार दिला आहे. महापालिका निवडणूक होईपर्यंत त्यांच्याकडेच पदभार राहील. निवडणूक झाल्यानंतर महापालिकेला नवीन आयुक्त दिला जाईल, असेही पवार यांनी सांगितले.




