Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

शिवनेरी प्रेरणेची तर आग्र्याचा लाल किल्ला ही स्वाभिमानाची भूमी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लाल किल्ल्यात शिवजन्मोत्सवाचा सोहळा उत्साहात

आग्रा | छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही देशाला एक तेजस्वी प्रेरणादायी इतिहासाचे पुन्हा स्मरण करण्याची संधी आहे. शिवरायांची जन्मभूमी असलेला शिवनेरी किल्ला प्रेरणेची तर आग्र्याचा लाल किल्ला ही स्वाभिमानाची भूमी आहे. आग्रा येथे ज्या ठिकाणी महाराजांना कैद केले होते तेथे पुढील वर्षी स्मारकाचे काम सुरु झालेले असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

शिवजयंतीनिमित्ताने आग्रा येथील ऐतिहासिक लाल किल्ला येथे अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘शिवजन्मोत्सव भारतवर्ष का’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील, उत्तर प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार प्रशांत बंब, मीना बाजार ट्रस्टचे अनिल गुप्ता, कार्यक्रमाचे आयोजक व प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या अनोख्या महोत्सवाच्या आयोजनाचे हे चौथे वर्ष आहे.

आग्रा येथील लाल किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्याची परंपरा ही वैशिष्ट्यपूर्ण असून यापुढे ती निष्ठेने जपली जाईल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, आग्रा येथील शिवाजी महाराजांना कैद केलेल्या जागेवर स्मारक उभारण्याचा संकल्प गेल्या जयंतीदिनी आम्ही सोडला होता. हे स्मारक उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने समिती गठित केली. उत्तर प्रदेश सरकारनेही जमीन अधिग्रहणासंदर्भात मंत्रिमंडळात निर्णय घेत सहकार्य केले असून या स्मारकाच्या निर्मितीला लवकरच गती मिळेल. तसेच पुढच्या वर्षापासून या जागेवरही जयंती साजरी केली जाईल. शिवरायांचा इतिहास महाराष्ट्रात शिकवला जातो तो आता देशभरात शिकवला जावा या जनभावनेच्या आदर करून नव्या सीबीएसईच्या पुस्तकात आता शिवरायांच्या इतिहासाला २० पाने दिली आहेत. यापूर्वी केवळ एका परिच्छेदात हा इतिहास सांगण्यात आला होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने हा इतिहास आता सर्वत्र पोहोचत असल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

छत्रपती शिवरायांच्या ४०० व्या जन्मशताब्दी वर्षी म्हणजे २०३० मध्ये आग्रा येथील याच लाल किल्ल्यात पंतप्रधान मोदींसह आम्ही हा उत्सव साजरा करु, असे आत्मविश्वासाने सांगून मुख्यमंत्री म्हणाले, अनेक योद्धे देशात झाले पण शिवराय अद्वितीय होते. बलाढ्य मुघलांशी अनेकांनी समझोता केला मात्र, अशा काळातही शिवरायांना रयतेचे राज्य स्थापन करण्याची प्रेरणा माँसाहेब जिजाऊंनी दिली. त्यानंतर शिवरायांनी प्रतिज्ञा घेऊन यासाठी स्वराज्यनिर्मितीचा ध्यास घेतला. अठरापगड जातींना सोबत घेऊन महाराजांनी स्वराज्य, स्वभाषा आणि स्वाभिमानाच्या लढाईची शिकवण दिली. महाराजांनी रूढ केलेला गनिमी कावा जगभरात स्वीकारला गेला. महाराजांनी केवळ राज्य स्थापन केले नाही तर एक विचार दिला. त्यामुळे मुघलांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही हिंदवी स्वराज्य नष्ट झाले नाही. उलट हे साम्राज्य नष्ट करण्यासाठी महाराष्ट्रात आलेल्या औरंगजेबाची कबरच इथे खोदली गेली.

पुढील काळात तर मराठी साम्राज्य कटकपासून अटकपर्यंत पोहोचले. मुघलांनंतर थेट इंग्रज राज्य स्थापन झालेले नाही. त्यामधल्या काळात मराठ्यांचा उज्वल इतिहास निर्माण झाला आहे. मात्र, तो दुर्लक्षित केला गेला होता. या गौरवशाली इतिहासाला आम्ही पुन्हा उजाळा देत आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीती आणि न्यायदानाचा गौरव करत महाराजांनी जगाला दिलेली गनिमी काव्याची युद्धपद्धती आजही तितकीच प्रभावी असल्याचे सांगितले. ते म्हणाले, महाराजांनी सुरत लुटली हा गैरसमज दूर करण्याची गरज आहे; उलट तिथल्या व्यापाऱ्यांनी मुघल सत्तेच्या जाचातून मुक्त होण्यासाठी महाराजांना पाचारण केले होते, याचे दाखले आहेत. ज्यावेळेस सुरतमध्ये शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण झाले त्यावेळेस लाखोंचा जनसागर उपस्थित होता. त्यानंतर तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने गुजरातमधील नवसारी, सोनगड, व्यारा अशा अनेक ठिकाणी महाराजांचे पुतळे उभारण्यात आले. परस्त्रीला मातेचा दर्जा देऊन त्यांनी स्त्री सन्मानाचा सर्वोच्च आदर्श जगासमोर ठेवला. न्यायदानाच्या बाबतीत महाराज अत्यंत कठोर आणि निष्पक्ष होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गुजरातमध्ये ‘जाणता राजा’ महानाटकाद्वारे हे शिवविचार घराघरांत पोहोचवण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा        :              PCMC | स्थायी समितीसह सर्व समित्यांच्या सदस्यांची आज निवड 

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी सांगितले की, शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेमागे राजमाता जिजाऊंनी केलेले संस्कार आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची दिलेली प्रेरणा ही मुख्य शक्ती होती. जिजाऊंनी त्यांना देशावरील आक्रमणांची जाणीव करून दिली, ज्यामुळे महाराजांनी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी गुलामगिरीविरुद्ध लढा पुकारला. बाजीप्रभू देशपांडे यांचा पावनखिंडीतील अभूतपूर्व लढा आणि महाराजांची आग्र्याहून झालेली सुटका ही त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेची व शौर्याची प्रतीके असल्याचे त्यांनी सांगितले. महाराजांचा हा पराक्रमी इतिहास तरुणांनी केवळ वाचू नये, तर तो आचरणात आणावा, असे आवाहनही त्यांनी केले.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाला उजाळा देतांना सांगितले की शिवाजी महाराजांनी स्वतःच्या सुखाचा त्याग करून आपले संपूर्ण जीवन जनता, देश आणि धर्मासाठी समर्पित केले. त्यांनी केवळ स्वराज्यच नाही, तर रयतेला स्वाभिमान आणि स्वभाषा दिली. अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची ताकद देणारा हा राजा जगाच्या इतिहासात अद्वितीय असून ते एकमेव उपभोगशून्य स्वामी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांच्या पराक्रमाचा सेवक म्हणून काम करत जगभर महाराजांच्या संरक्षण मूल्यांची ओळख करून दिली आहे. आज यूनेस्कोनेही १२ गड किल्ल्याचा जागतिक वारशामध्ये समावेश केला. शिवनेरीपासून जिंजीपर्यंत पसरलेले महाराजांचे १२ किल्ले समुद्र, जमीन, डोंगर व पठार अशा सर्व भौगोलिक प्रकारांत उभे असलेले अद्वितीय संरक्षण कवच निर्माण करणारे शिवाजी महाराज एकमेव राजे आहेत असे सांगून भारतीय नौदलाच्या ध्वजावर आणि गणवेशावर शिवरायांची असलेली राजमुद्रा ही प्रत्येक शिवप्रेमीसाठी अभिमानाचा क्षण असल्याचेही ते म्हणाले.

लंडनमधून रघुजी भोसले यांची तलवार भारतात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या प्रयत्नांचे विशेष कौतुक करुन

शिवरायांच्या आदर्शांवर चालत भारताच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आणि त्यांचा तेजस्वी वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन मंत्री ॲड. शेलार यांनी यावेळी केले.

मंत्री उपाध्याय यांनी सांगितले की आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणारे एक भव्य आणि जागतिक दर्जाचे स्मारक साकारले जात आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने आग्र्यातील ‘या स्मारकाचे अंतिम टप्प्यात असून उर्वरित कायदेशीर प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल.

ज्या भूमीवर औरंगजेबाने महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, त्याच ठिकाणी आता शिवरायांचा स्वाभिमान झळकणार आहे. हे स्मारक पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण ठरेल आणि ‘मराठा शौर्य दिना’सारख्या उपक्रमांतून महाराजांच्या ऐतिहासिक आग्रा सुटकेच्या स्मृतींना उजाळा दिला जाईल. दोन्ही राज्यांच्या समन्वयातून हे प्रेरणादायी स्मारक लवकरच पूर्णत्वास जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button