ताज्या घडामोडीराजकारणविदर्भ

जळगाव आणि रावेरमध्ये मविआच्या उमेदवारांना केलं भुईसपाट

भाजपच्या विजयी महिला उमेदवारांनी बाजी मारली

जळगाव : जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांनी बाजी मारली. स्मिता वाघ या पहिल्यांदाच लोकसभेत पोहोचत त्यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघांमध्ये इतिहास घडवला आहे. या मतदारसंघात आतापर्यंत एकही महिला उमेदवाराला या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली नव्हती. मात्र भाजपकडून प्रथमच जळगाव लोकसभा मतदारसंघांमध्ये एक महिला म्हणून भाजपाने उमेदवार उभा केला होता. जवळपास अडीच लाखांच्या मताधिक्यांनी स्मिता वाघ यांचा विजय होत त्यांनी एक इतिहास रचला आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघात खासदार रक्षा खडसे यांची तिसऱ्यांदा हॅट्रिक होते किंवा नाही ही धाकधूक होती. पहिल्या फेरीपासून रक्षा खडसे या मताधिक्याच्या शेवटच्या फेरीपर्यंत दोन लाख ७२ हजारांची मजल मारत रावेर लोकसभा मध्ये त्यांनी देखील इतिहास घडवला आहे. २००८ नंतर रावेर लोकसभा मतदारसंघांमध्ये पहिल्यांदाच हॅट्रिक करणाऱ्या खासदार रक्षा खडसे या ठरल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आता मंत्रिपदाच्या अपेक्षा देखील केल्या जात आहेत.

महाविकास आघाडीकडून जळगावचे उमेदवार करण पवार आणि रावेरचे उमेदवार श्रीराम पाटील यांना पक्षांतर्गत नाराजीचा फटका बसल्याचे मतदारसंघांमध्ये बोलले जात आहे. स्मिता वाघ यांना सहानुभूती लाभली आहे. रक्षा खडसे या घटक पक्षातील नाराजी दूर करण्यात यशस्वी ठरल्याशिवाय वैयक्तिक संबंध, कामगिरी आणि सासरे आमदार एकनाथराव खडसे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर मैदानात उतरून रक्षा खडसेंसाठी मतदारसंघ पिंजून काढला. त्यांचा विजय खेचण्यात एकनाथ खडसे यांचा मोठा मोलाचा वाटा आहे.

जळगावमध्ये माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यासोबत करण पवार यांनी भाजप सोडून उद्धव ठाकरे सेनेत एन्ट्री केली. ”बाहेरून आलेल्या नेत्यांना पक्षात घ्या. परंतु उमेदवारी पक्षातीलच नेते, पदाधिकाऱ्यांना द्या’, असं सुत्र ठाकरे गटात सुरुवातीपासूनच होतं. ललिता शाम पाटील या भाजपमधून उद्धव ठाकरे सेनेत आल्या आणि त्यांनाच उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झाले होते आणि तेव्हाच ठाकरे सेनेने ही भूमिका घेतली होती. त्यानंतर उन्मेश पाटील आणि करण पवार यांची एन्ट्री झाली आणि तेव्हापासूनच शिवसेना ठाकरे गटामध्ये नाराजीचा सूर उमटू लागला.

देशातील सत्ताधारी पक्षाचा खासदार आपल्या पक्षात येतोय हा एक मोठा संदेश राज्यात जाईल आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल, असा आत्मविश्वास बांधून उन्मेश पाटील यांच्यासोबत उद्धव सेनेत आलेल्या करण पवरांना उमेदवारी देण्यात आली. पक्षातील इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्याने साहजिकच त्यांनी नाराजी व्यक्त केली. परिणामी अपेक्षित मदत न झाल्याने त्यांचे पडसाद मतदानातून उमटले. स्मिता वाघ प्रचारात एकट्या फिरल्या पती उदय वाघ यांचे निधन झालेले असल्याने मतदारांची सहानुभूती त्यांना लाभली.
रावेरमध्ये पुन्हा कमळ फुललं; मंत्रीपद मिळण्याच्या कार्यकर्त्यांच्या चर्चांवर रक्षा खडसे रोखठोक बोलल्या

रावेरमधून भाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्यानंतर रावेर लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यावी? हा प्रश्न मविआला पडला होता. पक्षाशी एकनिष्ठ असलेले रवींद्र भैय्या पाटील यांचे जवळपास नाव निश्चित झाले होते. मात्र त्यांच्याजवळ आर्थिक ताळेबंद नसल्याने त्यांची उमेदवारी डावलण्यात आली असल्याचा देखील आरोप माजी आमदार संतोष चौधरी यांनी भुसावळ येथे झालेल्या सभेत केला होता. त्यानंतर श्रीराम पाटलांविरुद्ध भुसावळमधून माजी आमदार संतोष चौधरी यांनी बंड पुकारले होते. नंतर त्यांच्यात मनोमीलन झाले. पण ते मतपेटीतून उमटले नाही. श्रीराम पाटील राजकारणात फार सक्रिय नव्हते. परंतु निवडणुकीच्या काळात ते वेगवेगळ्या पक्षाच्या संपर्कात राहिले आणि तीन पक्ष बदलून आलेल्या श्रीराम पाटील यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी दिल्याने पक्षातूनच नाराजीचा सूर उमटला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button