‘पोलीस दल अधिक सक्षम करण्यासाठी सर्वतोपरी मदत’; पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे नागरिकांसोबतच पर्यटकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित वाटावे, यासाठी पोलिसांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. पोलीस दल हे समाजाच्या सुरक्षेचा मजबूत आधार आहे. त्यामुळे त्यांना आधुनिक साधने आणि सुविधा देणे ही शासनाची प्राथमिकता आहे. जिल्हा नियोजन निधीतून पोलिसांना २८ अत्याधुनिक वाहने देण्यात आली आहेत. या वाहनांमुळे गुन्हे रोखणे, तपास करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत देणे अधिक सोपे आणि जलद होणार आहे. यापुढेही पोलीस दल अधिक मजबूत करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.
जिल्हा पोलीस दल अधिक सक्षम व आधुनिक बनविण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत पालकमंत्री नितेश राणे व गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते पोलीस दलासाठी २८ अत्याधुनिक वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, उपाध्यक्ष दादा साईल, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम तसेच पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी आदी उपस्थित होते.
हेही वाचा – ‘महाराष्ट्रात गेमिंग, क्रिएटर इकॉनॉमी आणि पायाभूत सुविधा उभारण्यावर भर’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पालकमंत्री राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस दल सक्षमपणे करत आहे. नागरिकांबरोबरच पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. कायदा व सुव्यवस्था राहिली तर जिल्ह्यात गुंतवणुक व रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन कशा प्रकारे अधिक बळकट करता येईल, यासाठी पालकमंत्री म्हणून मी नेहमी प्रयत्नशील आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांना या वाहनांचा उपयोग होणार आहे. आपल्या जिल्ह्यात पर्यटकांची संख्या अधिक असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सीसीटीव्ही देखील पोलीस दलाला उपलब्ध करुन देण्यात येतील. ‘नशामुक्त जिल्हा’ अशी आपल्या जिल्ह्याची ओळख निर्माण करुन एक आदर्श जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याला अग्रेसर ठेवायचे आहे, असेही मंत्री राणे यावेळी म्हणाले. जिल्ह्याच्या सुरक्षिततेबरोबरच नागरिकांशी संवाद साधण्यासाठी जिल्हा पोलीस दल अभिनव उपक्रम राबवित आहे. पोलीस नागरिकांपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.
गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सागरी किनारपट्टी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, सागरी सुरक्षेला बळकटी देण्यासाठी किनारपट्टी भागात सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे. यामुळे संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे सुलभ होऊन गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होईल. तसेच, मच्छीमार व स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठीही ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास तसेच आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देण्यास पोलीस यंत्रणेला मोठी मदत होणार आहे. विकासाची दूरदृष्टी लाभलेल्या पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाच्या कारभारामध्ये एआय तंत्रज्ञानाचा समावेश करणारा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. तो नक्कीच कौतुकास्पद आहे. या उपक्रमाचे अनुकरण इतर जिल्हे नक्कीच करतील असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने पोलीस दलासाठी गृहनिर्माण प्रकल्प राबविल्या जात आहे. यामुळे त्यांच्या घराचा प्रश्न सुटणार आहे असेही ते म्हणाले.





