मिहीर शाह याच्या घरावर बुलडोझर कधी चालणार? आदित्य ठाकरेंचा सवाल

मुंबई | वरळी हिट अँड रन प्रकरणावरून वातावरण तापलं आहे. वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मृत महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर आक्रमक होत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही सवाल केले आहेत. वरळीची केस हिट अँड रनची नाही. तर मर्डर केस म्हणून बघावी. मी त्या कुटुंबीयांची भेट घेतली. तो अपघात इतका भयंकर होता की एखादा राक्षसच असं काही करू शकतो, असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच, मिहीर शाह याच्या घरावर बुलडोझर कधी चालणार? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
आदित्य ठाकरे म्हणाले, तुम्ही कुठेही बुलडोझर चालवा. मात्र मिहीर शाह याच्या घरावर बुलडोझर कधी चालणार? हे पाहणं गरजेचं आहे. नरकातून राक्षस आला तरीही अशी कृती करणार नाही, तितकी वाईट ही केस आहे. अनेक लोक सांगतील की नुकसान भरपाई वगैरे देतो. पण त्यांना एक रुपया नकोय. त्यांना मिहीर शाह याला शिक्षा झालेली बघायची आहे. धडक दिल्यानंतर मिहीर शाह जर थांबला असता तरीही कावेरी नाखवांचा जीव वाचला असता. नाखवा कुटुंब प्रचंड दुःखात आहे. इतकी भयंकर गोष्ट मुंबई, महाराष्ट्रात ही गोष्ट घडू शकते हे पाहूनच दुर्दैवी वाटतं.
हेही वाचा – अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बालेकिल्ल्यात खिंडार, ४० पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करणार
गुन्हेगार असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करुन तुम्ही त्याला तुरुंगात टाकू शकता पण असा राक्षस असेल तर काय करणार? मिहीर राजेश शाह राक्षसच आहे. इतकं भयानक हे कृत्य आहे. ६० तासांनंतर जी अटक झाली आहे. त्याला साठ तास का लपायला दिलं? गृहखातं का शांत आहे, गृहमंत्री का शांत आहेत? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.