आयटीआयमध्ये 25 ते 35 टक्के जागा रिक्त; मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली माहिती

Mangal Prabhat Lodha : राज्यातील खासगी व शासकीय आयटीआयमधील शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी खासगी आयटीआय सुधारणा व कौशल्य विकासासाठी समिती करण्यात येईल. या समितील तीन महिन्यात अहवाल सादर करण्यात सुचित केले जाईल.
तसेच सध्या आयटीआयमध्ये 25 ते 35 टक्के जागा रिक्त आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत दिली.
मंत्री लोढा म्हणाले, राज्यात सुमारे 585 खासगी आयटीआय असून विद्यार्थ्यांकडून 20 ते 30 हजारांपर्यंत शुल्क घेतात. एससी, एसटी, एसबीसी आणि ईडब्ल्यूएस घटकांसाठी शासनाने मागील चार वर्षांत सुमारे 17.68 कोटी रुपयांचे वाटप केले आहे. तसेच राज्यात प्रत्येक तालुक्यात एक आयटीआय हे धोरण कायम ठेवण्यात येणार असून, नवीन तालुका निर्माण झाल्याशिवाय नवीन आयटीआयला मान्यता दिली जाणार नाही.
हेही वाचा – नवी दिल्लीत ‘महाराष्ट्र साडी प्रदर्शना’चा दिमाखदार प्रारंभ
महत्त्वाचे म्हणजे सध्या आयटीआयमध्ये 25 ते 35 टक्के जागा रिक्त असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आयटीआयमधील पायाभूत सुविधा व गुणवत्ता सुधारण्यासाठी वर्ल्ड बँकच्या माध्यमातून सुमारे 1400 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत 100 आयटीआयच्या विकासाचेही नियोजन आहे. तसेच आयटीआय दत्तक योजना राबवून सार्वजनिक-खासगी सहभागातून सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच पार्टटाईम प्रशिक्षकांना नियमित करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तीन महिन्यांत पात्र उमेदवारांना कायम नियुक्ती देण्यात येईल. तसेच सहा महिन्यांत सर्व रिक्त पदे भरण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.





