TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपुणे

पुण्यात राजकीय वातावरण तापलं; भाजप पदाधिकाऱ्यांवर मोक्का लावण्याची मागणी

पुणे | भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या दौऱ्यावेळी झालेल्या राड्यानंतर पुण्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. इराणी यांच्याविरोधात आंदोलन करताना भाजप कार्यकर्त्याने राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण केली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेत आज मूक आंदोलन केलं. या आंदोलनाला उत्तर म्हणून भाजपचेही कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने आज शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघालं.

राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. ‘भाजप पदाधिकाऱ्याच्या मारहाणीत माझ्या कानाच्या पडद्याला मार लागल्याने सूज आली आहे. मी काल दिवसभर घरी होते, अनेकजण भेटायला आले. मागच्या काळात स्त्रियांना किती संघर्ष करावा लागला आहे. सावित्रीबाई फुलेंना दगड-धोंडे खावे लागले आहेत. आपण या युगातल्या महिला आहोत. प्रकार वेगळा आहे, पण तेच सोसावं लागत आहे,’ असं नागवडे यांनी म्हटलं आहे.

भाजप कार्यकर्त्यांवर मोक्का लावण्याची मागणी

मूक आंदोलनानंतर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेत भाजप कार्यकर्त्यांवर मोक्का लावण्याची मागणी केली आहे. महाविकास आघाडीच्या या मागणीनंतर पुणे पोलीस काय कारवाई करणार, हे पाहावं लागेल.

भाजपकडून जोरदार पलटवार

राष्ट्रवादीच्या मूक आंदोलनानंतर भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही रस्त्यावर उतरत राष्ट्रवादीविरोधात आक्रमक घोषणाबाजी केली. राष्ट्रवादीकडून आमच्या पदाधिकाऱ्यांकडून विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, असा आरोप मुळीक यांनी केला आहे.

दरम्यान, पुणे महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आणि महाविकास आघाडीतील संघर्ष तीव्र झाला असून थेट रस्त्यावर उतरून एकमेकांना आव्हान दिलं जात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे हा संघर्ष आगामी काळात आणखी टोकदार होण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button