ताज्या घडामोडीमुंबई

मनसे पदाधिकाऱ्यांचा बनाव पोलिसांकडून उघड; हनुमान चालिसाच्या नावाखाली केली दिशाभूल

नवी मुंबई |  नेरुळ येथील मशिदीसमोर स्पीकरवरून हनुमान चालीसा प्रक्षेपित केल्याचा जुईनगर येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा दावा खोटा ठरला आहे. ही कृती दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारी असल्याचा ठपका ठेवत नेरुळ पोलिसांनी मनसेचे जुईनगर येथील शाखाध्यक्ष अक्षय भोसले, उमेश गायकवाड, श्रीकांत माने व इतर कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांची धरपकड सुरू केली आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी नेरुळ येथील जामा मशिदीसमोर स्पीकरवरून हनुमान चालीसा प्रक्षेपित करण्याचे आंदोलन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नवी मुंबई पोलिसांनी सर्वच धार्मिक स्थळांबाहेर चोख बंदोबस्त ठेवला आहे. पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना सीआरपीसी १४९ अंतर्गत नोटिसादेखील बजावल्या होत्या. तसेच अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यातदेखील घेतले होते.

४ मे रोजी पहाटे ५ वाजता नेरुळ सेक्टर-११मधील जामा मशिद व आजूबाजुच्या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असताना अजानच्यावेळी स्पीकरवरून हनुमान चालीसा प्रक्षेपित केल्याचा दावा मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला होता. तसेच, काही वृत्तवाहिन्या व सोशल मीडियावर यासंबंधी व्हिडीओ प्रसारित करण्यात आला होता. मात्र तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना हनुमान चालीसाचा आवाज ऐकू आला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी हा व्हिडीओ पाहिला असता, त्यात मनसेचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते या मशिदीपासून दीडशे ते दोनशे मीटर अंतरावर एपीजे स्कूलच्या मैदानाच्या बाजूला असल्याचे दिसून आले.

पोलिसांनी एपीजे हायस्कूलच्या मैदानाजवळ तैनात असलेल्या सुरक्षारक्षक तसेच त्या भागातील आजूबाजुच्या इमारतीतील रहिवाशांकडे जाऊन चौकशी केली. मात्र कोणालाही हनुमान चालीसाचा आवाज ऐकू आला नसल्याचे आढळून आले. आधीच रेकॉर्ड केलेले व्हिडीओ वापरून या कार्यकर्त्यांनी सर्वांची दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी आता या कार्यकर्त्यांची धरपकड करणे सुरू केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button