कारला धक्का लागल्याने पीएमपीएमएल बस चालकाला बेदम मारहाण
पिंपरी l प्रतिनिधी
रस्त्यावरून वळताना पीएमपीएमएल बसचा एका कारला धक्का लागला. या कारणावरून कार चालकाने पीएमपीएमएल बस चालकाला बेदम मारहाण केली. तसेच बस चालक करत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला. ही घटना गुरुवारी (दि. 24) दुपारी साडेचार वाजता पिंपरी येथील एमएसईबी बस थांबा येथे घडली.
शरद लक्ष्मण तांदेळे (वय 32, रा. लोणी काळभोर) असे जखमी चालकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एम एच 03 / ए एम 6293 या कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पीएमपीएमएल मध्ये कंत्राटी चालक म्हणून काम करतात. गुरुवारी ते दुपारी साडेचार वाजता पिंपरी गावात बस घेऊन आले असताना एमएसईबी ऑफिस जवळील बस थांब्यावर बस वळवत असताना त्यांच्या बसचा आरोपीच्या कारला धक्का लागला. या कारणावरून आरोपीने फिर्यादी यांच्या नाकावर हाताने ठोसा मारून जखमी केले. यात फिर्यादी यांच्या नाकाला टाके पडले आहेत. फिर्यादी करीत असेलल्या शासकीय कामात आरोपीने अडथळा निर्माण केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.