डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पिंपरी चिंचवडमध्ये मानवंदना
पिंपरीतील भीमसृष्टी येथे आयोजित ‘विचार प्रबोधन पर्व कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी : पिंपरी चिंचवडमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रमातून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. पिंपरी महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या विचार प्रबोधन पर्व कार्यक्रमातून महामानवाला सुरेल मानवंदना देण्यात आली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ११ ते १६ एप्रिल २०२५ रोजी ‘विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन पिंपरी येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाशेजारील (भीमसृष्टी) मैदानात करण्यात आले आहे. शनिवार १२ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा महामानवांच्या गीतांचा बहारदार कार्यक्रम याठिकाणी संपन्न झाला.
या कार्यक्रमास अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य (सचिव दर्जा) गोरक्ष लोखंडे, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, माजी नगरसदस्य बाबासाहेब त्रिभुवन,कार्यकारी अभियंता सतिश वाघमारे,क्रीडा अधिकारी अनिता केदारी, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,कामगार नेते गणेश भोसले,तुकाराम गायकवाड,उपअभियंता चंद्रकांत कुंभार तसेच महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी उपस्थिती लावली होती. सायंकाळी ७ वाजल्यापासूनच मैदानात गर्दी होऊ लागली आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला मैदान श्रोत्यांनी भरून गेले होते. या सांस्कृतिक सत्रात आनंद शिंदे यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित अनेक गीते सादर केली.
कार्यक्रमादरम्यान सुप्रसिद्ध गायक आनंद प्रल्हाद शिंदे यांनी बाबासाहेबांच्या विचारांची आणि सामाजिक योगदानाची आठवण करून दिली. गाण्यांमधून त्यांनी सामाजिक समतेचा आणि बंधुत्वाचा संदेश दिला. विशेषतः नव्या पिढीपर्यंत डॉ. आंबेडकरांची शिकवण पोहोचवणे, हा उद्देश त्यांनी आपल्या सादरीकरणातून अधोरेखित केला. ‘विचार प्रबोधन पर्वाचा उद्देश सामाजिक सुधारणांचे महत्त्व आणि महामानवांचे कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे असून, सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या कार्यक्रमाने त्या उद्दिष्टाला प्रभावीपणे हातभार लागला.
दरम्यान, महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विचार प्रबोधन पर्वाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून १५ एप्रिलपर्यंत विविध सांस्कृतिक तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन पिंपरी येथे करण्यात आले आहे.