पद्मभूषण पुरस्कारित संत सिद्धेश्वर महास्वामीजी यांचे तृतीय पुण्यस्मरण
शिक्षण विश्व: अध्यात्मिक कार्याची स्मृती व श्रद्धांजली समारंभात अभिवादन

पिंपरी-चिंचवड | पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित अध्यात्मिक गुरु पूज्यपाद सिद्धेश्वर महास्वामीजी यांचे तृतीय पुण्यस्मरण आज संत साई इंग्लिश मीडियम हायस्कूल येथे श्रद्धांजली अर्पण करून साजरे करण्यात आले.
स्मृती दिनाच्या पूर्वसंध्येला स्वामीजींच्या जन्मगावी बिजरगी, कर्नाटक येथे ४०० हून अधिक बैलगाड्यांच्या उपस्थितीत त्यांच्या फोटो प्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्यात स्थानिक नागरिकांबरोबरच शाळेचे संस्थापक ढवळेश्वर सर देखील सहभागी झाले.

हेही वाचा : माणगाव (ताम्हिणी घाट) बस अपघात : ४२ जखमींवर तातडीने उपचार सुरू!
स्मरण सोहळा पुष्पहार अर्पण, गंधलेपन आणि धूप-दीप प्रज्वलित करून सुरू झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता नारायणगावकर यांनी केले. शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यार्थीनी उपस्थित होते. श्लोक पठण करून स्वामीजींना अभिवादन करण्यात आले. स्वामीजींचे आध्यात्मिक व धार्मिक कार्य अत्यंत अनमोल आहे. विद्वत्ता व प्रभावी वक्तृत्वासाठी प्रसिद्ध असलेले स्वामीजी विजयपुरा येथील ज्ञानयोगाश्रमचे संस्थापक आहेत. त्यांनी उपनिषदे, भगवद्गीता, शरणतत्त्वज्ञान आणि सामान्य अध्यात्म यावर अनेक पुस्तकांचे लेखन केले. स्वामीजींचे वक्तव्य मृदू व विनयशील होते.
सन्माननीय संस्थापक अध्यक्ष शिवलिंगजी ढवळेश्वर सर यांनी सांगितले की, तीन वर्षांपूर्वी स्वामीजींचे देहावसान झाले, तरी त्यांचे विचार व आचार आपल्याबरोबर कायम राहतील. स्वामीजींनी अनेकांना आध्यात्मिक मार्गदर्शन करून जीवनात सकारात्मकतेचा मार्ग दाखविला आहे. स्मरण सोहळ्यात सुनीता ढवळेश्वर, मनोज वाबळे, काशिनाथ कतनाळी आणि भारती ढवळेश्वर उपस्थित होते.
श्वासागणिक जीवनाचे शाश्वत सिद्धांत कथन करणारे आध्यात्मिक ज्ञानाचे विद्यापीठ चालते-बोलते संत म्हणजेच पूज्यपाद सिद्धेश्वर महास्वामीजी. त्यांच्या साहित्यरुपी विचार आणि अनमोल कार्य सदैव आपल्यासाठी मार्गदर्शक ठरेल.
– शिवलिंगजी ढवळेश्वर, संस्थापक अध्यक्ष.




