मिशन- PCMC | दोन प्रभागांत आरक्षणातील दुरुस्तीमुळे राजकीय चित्र बदलले!
प्रभाग 30 मध्ये शेंडगे यांना लाभ, तर बदलामागे उपमुख्यमंत्री अजित पवारांची ‘कायदेशीर चाल’ चर्चेत

पिंपरी | पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरक्षण सोडतीतील तांत्रिक त्रुटी दुरुस्त करत राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग 19 आणि 30 मधील चार जागांचे आरक्षण बदलताच स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. या दुरुस्तीचा थेट राजकीय फायदा भाजपाच्या माजी नगरसेविका आशा शेंडगे यांना झाला असून, या बदलासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार कायदेशीर बाबींचा अचूक वापर केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
प्रभाग 30 मधील बदल शेंडगे यांच्यासाठी ‘गेमचेंजर’
प्रभाग 30 मध्ये आधी ओबीसी पुरुषांसाठी असलेली ‘क’ जागा आता ओबीसी महिला प्रवर्गात बदल केली आहे. त्यामुळे या प्रभागातून लढण्याचा मार्ग एकप्रकारे बंद झालेल्या माजी नगरसेविका आशा शेंडगे यांना पुन्हा सरळ उमेदवारीची संधी निर्माण झाली आहे. पूर्वीच्या आरक्षणात त्यांना कुटुंबातील एखाद्या पुरुष सदस्याला उमेदवारी द्यावी लागणार होती. मात्र आता बदलामुळे शेंडगे स्वतःच निवडणूक रिंगणात उतरण्यास मोकळ्या झाल्या आहेत. स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्येही या दुरुस्तीबद्दल समाधानाचे वातावरण आहे.
‘कायदेशीर अचूक चाल’ – अजित पवारांच्या भूमिकेची चर्चा
या दुरुस्तीमुळे प्रभाग 19 आणि 30 मधील आरक्षणांचे गणित पूर्णतः बदलले असले तरी, राजकीय वर्तुळात अजित पवारांच्या भूमिकेची जोरदार चर्चा आहे. या प्रभागात आता राष्ट्रवादीचे पॅनेलसुद्धा स्ट्राँग झाले आहे. विशेष म्हणजे, निवडणूक आयोगाने अनुसूचित जाती/जमाती आरक्षण असलेल्या प्रभागांमध्ये ओबीसी महिला आरक्षणाची सक्ती असल्याचे कारण देत दुरुस्ती केली. परंतु, ही कमतरता ‘कायदेशीर बाबींचा अचूक अभ्यास’ करून दाखवण्यात आल्यानेच आयोगाला बदल करावा लागला, असा दावा पिंपरी-चिंचवडमधील काही वरिष्ठ नेते करताना दिसत आहेत. त्यामुळे ही दुरुस्ती केवळ नियमांनुसार झाली की त्यामागे अजित पवारांची रणनीती होती, यावर आता राजकीय भाष्य चर्चेत आहे.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक : आरक्षण सोडतीतील दुरुस्तीनंतर चार जागांमध्ये बदल
दोन प्रभागांचे बदललेले आरक्षण पुढीलप्रमाणे :
प्रभाग 19 –
अ : अनुसूचित जाती (महिला)
ब : ओबीसी
क : सर्वसाधारण (महिला)
ड : सर्वसाधारण
प्रभाग 30 –
अ : अनुसूचित जाती
ब : अनुसूचित जमाती (महिला)
क : ओबीसी (महिला)
ड : सर्वसाधारण
उमेदवारांच्या गणितात फेरबदल, हरकतींसाठी २४ नोव्हेंबरपर्यंत मुदत
या दुरुस्तीमुळे अनेक इच्छुकांना आपली रणनीती नव्याने आखावी लागणार असून, अनेक प्रभागांमध्ये संभाव्य उमेदवारांचे समीकरण बदलले आहे. आरक्षणाबाबत हरकती नोंदवण्यासाठी २४ नोव्हेंबरपर्यंत मुदत ठेवण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पवार यांनी दिली.
कासारवाडी आणि परिसरामध्ये मी विकासकामांद्वारे कायापालट केला आहे. मी केलेले काम लोकांच्या समोर आहे. ज्यावेळी भाजपाकडे कोणी नव्हते, त्यावेळी आम्ही काम सुरू केले आहे. भाजपाचे पॅनेल प्रभागात सक्षम होईल. आम्ही पुरूष उमेदवार लढवण्याचा कोणताही विचार केला नव्हता. पण, केलेल्या चांगल्या कामाची पोहोच पावती मिळाली आणि आरक्षणामध्ये बदल झाला. त्यामुळे निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘मेरिट’ च्या आधारे आम्ही सक्षम आहोत.
– आशा शेंडगे, मा. नगरसेविका.




