वायसीएम रूग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह!
तातडीने उपाययोजना करण्याची विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांची मागणी

पिंपरी | पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत कार्यरत असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वाय.सी.एम.एच.) येथील सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर त्रुटी असल्याचा मुद्दा समोर आला आहे. विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी रुग्णालयाच्या पाहणी दौऱ्यानंतर आयुक्तांकडे लेखी निवेदन सादर करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
भेटीदरम्यान रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सक्षम सुरक्षा यंत्रणा नसल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी नमूद केले. येणाऱ्या नागरिकांची मेटल डिटेक्टर मशीन किंवा बॅग तपासणी यंत्राद्वारे तपासणी होत नसल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळल्याचे निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा : शिवसेना गटनेते विश्वजित बारणे यांनी विविध प्रश्नांवरून प्रशासनाला घेरले..!
भाऊसाहेब भोईर यांनी म्हटले आहे की, शहरातील समाजकंटकांकडून रुग्णालय परिसरात अनुचित व हिंसक प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत रुग्ण, डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. बॉम्ब किंवा इतर घातक शस्त्रांच्या वापराची शक्यता लक्षात घेता प्रवेशद्वारावर अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा उभारणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर मशीन व बॅग स्कॅनिंग मशीन बसवण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आदेश द्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान, या मागणीवर महानगरपालिकेकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. रुग्णालयात दररोज हजारो नागरिक उपचारासाठी येत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.




