पिंपळे सौदागरला मिळणार स्वतंत्र पोलीस ठाणे!
कायदा सुव्यस्था सक्षमीकरण: आमदार शंकर जगताप, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या पाठपुराव्याला यश

पिंपरी-चिंचवड : वेगाने विकसित होत असलेल्या पिंपळे सौदागर परिसरासाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. पिंपळे सौदागर येथे स्वतंत्र पोलीस ठाणे उभारण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, पोलीस आयुक्तालयाने याबाबतचा अधिकृत प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर आहे.
या मागणीसाठी भाजपा आमदार शंकर जगताप आणि भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. प्रशासकीय पातळीवर बैठका, निवेदने आणि गृह विभागाशी थेट संवाद साधत त्यांनी हा विषय प्राधान्याने मांडला. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले असून, प्रस्तावाला गती मिळाल्याने स्थानिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. यासाठी नगरसेविका अनिताताई काटे आणि कुंदाताई भिसे यांनीही सकारात्मक भूमिका बजावली.
वाढत्या शहराला सुरक्षा कवचाची गरज
पिंपळे सौदागर हा परिसर आयटी हब आणि आधुनिक निवासी भाग म्हणून झपाट्याने विकसित होत आहे. मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या, शैक्षणिक संस्था आणि वाढती लोकसंख्या यामुळे येथे कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी अधिक वाढली आहे. सध्या या भागाला जवळच्या पोलीस ठाण्यांवर अवलंबून राहावे लागत असल्याने आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होत होता. ही बाब लक्षात घेऊन स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी जोर धरत होती.
नवीन ‘परिमंडळ ४’ चा प्रस्तावही
या प्रस्तावात केवळ पोलीस ठाण्याचाच समावेश नसून, प्रशासकीय सुलभतेसाठी ‘परिमंडळ ४’ निर्माण करण्याचाही विचार करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरातील पोलीस यंत्रणा अधिक कार्यक्षम होण्यास मदत होणार आहे.
नागरिकांना होणारे फायदे
स्वतंत्र पोलीस ठाण्यामुळे पिंपळे सौदागरमध्ये पोलिसांची उपस्थिती वाढणार असून, गस्त अधिक नियमित होईल. तक्रारींवर त्वरित प्रतिसाद मिळाल्याने चेन स्नॅचिंग, घरफोडी आणि वाहतूक कोंडीसारख्या समस्यांवर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल. तसेच नागरिकांना पोलीस कामांसाठी लांब अंतरावर जाण्याची गरज भासणार नाही.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“पिंपळे सौदागरचा झपाट्याने विकास होत असताना नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे आवश्यक होते. वाढती लोकसंख्या लक्षात घेता स्वतंत्र पोलीस ठाण्याची गरज होती. आमदार शंकरशेठ जगताप यांच्या सहकार्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले, ही आनंदाची बाब आहे. या निर्णयामुळे परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि व्यावसायिक अधिक सुरक्षिततेचा अनुभव घेतील.
– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक, भाजपा.





