प्राध्यापकाच्या मानसिक छळाला कंटाळून पीएच.डी विद्यार्थिनीची आत्महत्या; संशयित शास्त्रज्ञ अटकेत

पिंपरी | शास्त्रज्ञ असलेल्या प्राध्यापकाकडून सुरू असलेल्या अनैतिक प्रकार, गैरवर्तन आणि मानसिक छळाला कंटाळून एका पीएच.डी विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. ११ एप्रिल) दुपारी एकच्या सुमारास शाहूनगर येथे घडली. या प्रकरणामुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियामधील सहाय्यक संचालक डॉ. ए. बिन्नीयामीन (वय ५०, रा. धानोरी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. न्यायालयात हजर केले असता, त्याला १५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आत्महत्या केलेल्या ३० वर्षीय विद्यार्थिनीच्या वडिलांनी या प्रकरणी शनिवारी (दि. ११ एप्रिल) भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा : इस्लामाबाद चर्चेनंतर अमेरिकेची कडक कारवाई; इराणविरोधात समुद्री नाकेबंदी जाहीर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी बॉटनी विषयात पीएच.डी करत होती. तिचा मार्गदर्शक असलेला प्राध्यापक डॉ. बिन्नीयामीन हा शास्त्रज्ञ असून, विद्यार्थिनीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ऑगस्ट २०२५ पासून प्राध्यापकाकडून गैरवर्तन आणि मानसिक छळ सुरू होता, असे नमूद करण्यात आले आहे. या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याचे तिने चिठ्ठीत लिहिले आहे. विशेष म्हणजे, आत्महत्येच्या दोन दिवस आधी संबंधित प्राध्यापकाने स्टॅम्प पेपरवर माफीपत्र दिले होते. पुन्हा असा प्रकार करणार नसल्याचे त्यात नमूद होते. मात्र, विद्यार्थिनी मानसिक धक्क्यातून सावरू शकली नाही.
मित्राला फोन करून दिली आत्महत्येची माहिती
विद्यार्थिनीचे आई-वडील गावी गेले असताना तिने शनिवारी दुपारी तिच्या मित्राला फोन करून आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले. त्यानंतर मित्राने तिला बोलण्यात गुंतवून ठेवत तिच्या घराकडे धाव घेतली. मात्र, तो घरापर्यंत पोहोचण्यापूर्वीच विद्यार्थिनीने पंख्याला गळफास घेतला.
तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला असून, पोलिस निरीक्षक भोजराज मिसाळ या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.





