निगडी–भक्तीशक्ती उड्डाणपूल ते स्पाईन रोड : अतिक्रमणाचा वाढता विळखा
त्रिवेणी नगर सिग्नल परिसरात वाहतूक कोंडी तीव्र; नागरिकांची तात्काळ कारवाईची मागणी
निगडी (पिंपरी चिंचवड) : भक्तीशक्ती उड्डाणपूल ते स्पाईन रोड, त्रिवेणी नगर सिग्नल या महत्त्वाच्या मार्गावर हातगाडीधारक आणि टपरीधारकांच्या वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी तीव्र होत असून पादचाऱ्यांसह वाहनचालकांच्या दैनंदिन प्रवासाला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या बेकायदेशीर अतिक्रमणामुळे कायदा-सुव्यवस्थेलाही धोका निर्माण होऊ लागल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
दरम्यान, या अतिक्रमणाविरोधात सारथी हेल्पलाईन, एफ विभागीय अधिकारी अतुल पाटील आणि अतिक्रमण विभागाकडे अनेकदा तक्रारी दाखल करूनही केवळ वरवरची कारवाई केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अतिक्रमण हटविल्यानंतर काही तासांत किंवा दुसऱ्याच दिवशी हातगाड्या आणि टपऱ्या पुन्हा तेच ठिकाणी उभ्या राहतात, यामुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
अतिक्रमणामुळे पादचारी मार्ग पूर्णपणे बंद झाल्याने शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना धोकादायक पद्धतीने रस्त्यावरून चालण्याची वेळ येते. अनेकदा अधिकारी कारवाईसाठी पोहोचल्यावर काही अतिक्रमणधारक त्यांच्यावर दबाव आणण्याचा, धमकावण्याचा प्रयत्न करतात, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच काही स्थानिक गुंड प्रवृत्तीचे लोक या अतिक्रमणांना मासिक वसूलीच्या मोबदल्यात संरक्षण देत असल्याचेही आरोप नागरिकांनी केले आहेत.
हेही वाचा : ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाची 15 एकर शासकीय जमीन बिनबोभाट लाटली!
पिंपरी चिंचवड शहरातील अतिक्रमण प्रश्नाबाबत पालकमंत्री अजितदादा पवार यांनी महापालिका प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या असतानाही प्रत्यक्षात केवळ कागदोपत्री कारवाई होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. परिणामकारक आणि कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यास परिस्थिती आणखी बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नागरिकांची ठाम मागणी
त्रिवेणी नगर सिग्नल परिसरातील सर्व अतिक्रमणावर तातडीची आणि कायमस्वरूपी कारवाई करावी.
अनधिकृत हातगाड्या, टपऱ्या आणि बांधकामे जप्त करून जागा पूर्णपणे मोकळी करावी.
कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना धमकावणाऱ्या अतिक्रमणधारकांवर पोलिसांकडून कठोर पावले उचलावी.
अतिक्रमणांना संरक्षण देणाऱ्या कथित मासिक वसुली प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करावी.




