पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत खोटी माहिती पसरवणाऱ्या व्हिडीओवर कारवाई; जिल्हाधिकारी कार्यालयाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश
भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांचे पिंपरी-चिंचवड पोलिसांना निर्देश

पिंपरी-चिंचवड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची खोटी व चुकीची माहिती देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. यासंदर्भात भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी मुख्यमंत्री कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पिंपरी-चिंचवड पोलिसांना दिले आहेत.
या व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अहमदाबाद येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे खोटे वृत्त देण्यात आले आहे. हा व्हिडीओ ‘akshit meena९९७’ या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सदर व्हिडीओ आक्षेपार्ह असून भाजप कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्याचे काळभोर यांनी नमूद केले.
हेही वाचा – महाराष्ट्रातील पहिला “वेस्ट टू वंडर वर्ल्ड” थीम पार्क पिंपळे सौदागरमध्ये!
सचिन काळभोर यांची मागणी :
या प्रकारामुळे फेक न्यूजचा धोका अधिकच गंभीर होत असून, पंतप्रधानांविषयी अशा स्वरूपाची चुकीची माहिती प्रसारित होणे अत्यंत गंभीर आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी आपल्या तक्रारीत केली होती.
त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेचे तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे लेखी आदेश दिले आहेत.
सध्या पिंपरी-चिंचवड पोलीस विभागाकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, या प्रकरणात कोणती कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी यानिमित्ताने जोर धरू लागली आहे.