ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

डासांच्या अळ्या आढळलेल्या ठिकाणांच्या जागा मालकांवर दंडात्मक कारवाई!

आयुक्त शेखर सिंह यांचा इशारा : शहरात उपाययोजनांबाबत आढावा बैठक

पिंपरी : डेंग्यू किंवा किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औद्योगिक, बांधकाम आस्थापना, कार्यालये, गृहसंस्था, घरे तसेच व्यावसायिक दुकानांसह सर्व आस्थापनांची तपासणी करून डासोत्पत्ती स्थळे तात्काळ नष्ट करावीत. तसेच डासांच्या अळ्या आढळलेल्या ठिकाणांच्या जागा मालकांवर आणि संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या तसेच करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी अभयचंद्र दादेवार, उप आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, अमित पंडित, अजिंक्य येळे, डॉ. अंकुश जाधव, सिताराम बहुरे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे तसेच वैद्यकीय अधिकारी आणि संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

महापालिका क्षेत्रातील खाजगी शाळा, महाविद्यालये, बांधकामाची ठिकाणे, विविध खाजगी दवाखाने व रुग्णालये, झोपडपट्टी व झोपडपट्टी सदृश ठिकाणे, प्रशासकीय कार्यालये, नागरी आरोग्य केंद्रे इत्यादी ठिकाणी डेंग्यू किंवा किटकजन्य आजाराबाबत जनजागृती करण्यात यावी. शहरातील डेंग्यू, मलेरिया प्रतिबंधक मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी स्वच्छ पाण्यात गप्पी मासे सोडणे, नागरिकांच्या घरांच्या कंटेनरचे सर्वेक्षण करणे, व्यवसायाच्या ठिकाणी वेळोवेळी पाहणी करणे यांसारख्या उपाययोजना राबविण्यात याव्यात. घराच्या आत आणि बाहेर स्वच्छ पाण्याने भरलेल्या कंटेनरमध्ये डासांची उत्पत्ती होत असते, शिवाय घरातील फ्लॉवर-पॉट, मनी प्लांट्स आणि फ्रीज ड्रिप पॅनमधील पाण्यात देखील अशी उत्पत्ती आढळून येते. यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सोशल मिडीयाच्या माध्यमातून किंवा इतर प्रसारमाध्यमांद्वारे शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी.

क्षेत्रीय कार्यालयनिहाय डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहिम प्रभावीपणे राबविण्यासाठी पथकांमार्फत खाजगी आस्थापना, बांधकामे, मोकळी मैदाने, शहरातील विविध उद्याने, भंगाराची किंवा इतर मोठी दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट यांची पाहणी करून डासोत्पत्ती ठिकाणे आढळलेल्या ठिकाणी संबंधितांवर दंडात्मक कारवाई करा. लोकप्रतिनिधी, शहरातील कलाकार, प्रसिद्ध खेळाडू यांना डेंग्यू जनजागृती कृती आराखड्यामध्ये सामिल करून घेऊन चित्रफिती तयार करून महापालिकेच्या अधिकृत सोशल मिडीया हॅन्डल्सद्वारे जनजागृती करा, ठिकठिकाणी डेंग्यू प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देण्यासाठी पोस्टर्स, बॅनर्स, भित्तीपत्रके, पॅम्प्लेट्स वितरित करा, अशा सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी दिल्या.

या बैठकीत आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी डेंग्यू जनजागृती कृती आराखड्याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यामध्ये साप्ताहिकदृष्ट्या करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये सर्व महापालिका आणि खाजगी रुग्णालयांमध्ये जनजागृती उपक्रम, रूग्णालयाच्या बाहेर आणि आतील भागातील स्थळांची पाहणी करणे, पॅम्फ्लेट वाटप, व्हिडीओ कॉन्फर्सिंगद्वारे बैठका, सर्व सरकारी आणि खाजगी कार्यालयांमध्ये जनजागृती, जनजागृतीबाबत पथनाट्ये, शिबीराचे आयोजन, सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये जनजागृती उपक्रम, डेंग्यू जागरूकता व्हिडिओ/ऑडिओ क्लिप, प्रजनन स्थळांची तपासणी, पॅम्फ्लेट वाटप, पोस्टर स्पर्धा, व्याख्याने, शालेय रॅली तसेच गणेश मंडळे, स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक मंच, यांचा उपक्रमात सहभाग या उपाययोजनांचा समावेश होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button