सीएनजीच्या तुटवड्यामुळे पीएमपीएलच्या शेकड़ो बसेस लेट

पुणे | शहरात दोन दिवसांपासून सीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक सीएनजी पंपांबाहेर वाहनांच्या लांबच लांब रागा लागल्या होत्या. परिणामी, रिक्षाचालक, सीएनजीवरील वाहने आणि विशेषत: ‘पीएमपीएलच्या बससेवेवर याचा मोठा परिणाम झाला. शनिवारी आणि रविवारी पीएमपीएलच्या शेकड़ो बसेस उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.‘गॅस अॅथोरिटी ऑफ इंडिया’ कडून (गेल) विविध पुरवठादारांना गॅसपुरवठा करण्यात येतो. ‘गेल’कडून मुंबईहून पुण्याला होणाऱ्या गॅस पाइपलाइनच्या देखभाल दुरुस्तीचे काम शनिवारी दुपारनंतर हाती घेण्यात आले होते. परिणामी, गॅसचा पुरवठा कमी दाबाने करावा लागला. याचा मोठा फटका ‘पीएमपीएल’च्या बससेवेला बसला आहे. पीएमपीएलच्या ताफ्यात सुमारे एक हजार 600 सीएनजी बसेस आहेत.
या बसेससाठी हडपसर, कात्रज, कोथरूड आणि न.ता. वाडी या आगारांमध्ये पीएमपीएलचे सीएनजी पंप आहेत. या ठिकाणी शनिवारपासून कमी दाबाने गॅसपुरवठा कमी होत असल्याने अनेक बसेसना गॅसपुरवठा होऊ शकला नाही. शनिवारी गॅसअभावी अनेक बसेस आगारांमध्ये उभ्या कराव्या लागल्या. तर, रविवारी गॅस भरण्यासाठी सीएनजी पंपांबाहेर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. याचा बससेवेवर परिणाम होऊन मार्गांवरील बसेसची संख्या कमी असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली होती.