हिंजवडीमध्ये आयटी पार्कमध्ये सिनेस्टाईल थरार!
पत्नीने नवऱ्याच्या प्रेयसीचे केले अपहरण
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड हिंजवडीतील आयटी पार्क परिसरात दिवसाढवळ्या एक खळबळजनक घटना घडली. पतीच्या विवाहबाह्य संबंधामुळे संतप्त झालेल्या पत्नीने आपल्या भावाची व आईची मदत घेऊन नवऱ्याच्या प्रेयसीचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी (दि. २० ऑगस्ट) सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. दरम्यान याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नियोजित दौरा असल्याने पोलिसांची पुरती धावपळ झाल्याचे पाहायला मिळाले.
फिर्यादी महिला हिंजवडीतील एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत आहे. तिला एका अज्ञात मोबाईल नंबरवरून ‘पार्सल आहे’ असे सांगून बाहेर बोलावण्यात आले. ती बाहेर येताच, आरोपींनी तिला कारमध्ये जबरदस्तीने बसवले व तिला मारहाण केली.
त्यानंतर तिला ताथवडे आणि वाकड परिसरात सुमारे दोन तास फिरवण्यात आले. यादरम्यान आरोपी पत्नीने पीडितेला पतीपासून दूर राहण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे पीडित महिला प्रचंड भयभीत झाली होती.
हेही वाचा : “कृष्ण विरुद्ध सुदर्शन: उपराष्ट्रपतीपदाची दक्षिणात्य लढत”
हिंजवडी पोलिस ठाण्याला या घटनेबाबत माहिती मिळताच, त्यांनी तत्काळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपींची कार व त्या दिशेने झालेल्या हालचालींचा माग काढत, पोलिसांनी कारचा शोध घेतला व पीडित महिलेला सुखरूप सोडवले.
गुन्हा दाखल
या प्रकरणी पत्नी, तिचा भाऊ आणि आई या तिघांविरोधात भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांनुसार अपहरण, जबरदस्ती व मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस अधिक तपास करत आहेत.
प्राथमिक चौकशीत आरोपी पत्नीने सांगितले की, पतीचे अन्य महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचे लक्षात आल्यानंतर ती मानसिक तणावात होती. त्यातूनच हा कृत्य केल्याचे ती म्हणाली.
स्थानिकांमध्ये खळबळ
हिंजवडीसारख्या उच्च सुरक्षा असलेल्या आयटी पार्क परिसरात ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य आणि भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत पीडितेला वाचवले. पोलिस अधिक तपास करत आहे.





