पावसाचा तडाखा; पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक ठिकाणी झाडपडी, वाहनांचे नुकसान
प्रशासनाची धावपळ : महानगरपालिका अग्निशमन दलाकडून मदतकार्य
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विविध ठिकाणी आपत्कालीन घटना घडल्या. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात दुपारी २.१४ ते सायंकाळी ७.२५ या कालावधीत अनेक घटनांची नोंद झाली.
या कालावधीत एका ठिकाणी इलेक्ट्रिकल डी.पी.ला आग लागल्याची घटना घडली. तसेच शहरातील विविध भागांत झाडे पडण्याच्या एकूण १७ घटना नोंदविण्यात आल्या. रावेत परिसरात सीमाभिंत कोसळल्याचीही एक घटना समोर आली. सुदैवाने या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा जखमींची नोंद झालेली नाही. मात्र, काही ठिकाणी पार्किंगमध्ये उभी असलेली वाहने झाडाखाली सापडल्याने त्यांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, अग्निशमन दलाने तात्काळ हालचाल करत घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी १० अग्निशमन वाहने, २ रेस्क्यू व्हॅन आणि सुमारे ८० जवान तैनात करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत मदत व बचावकार्य सुरू होते. अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पावसाळ्यापूर्वीच पाणी साचले…
हवामान खात्याने पुणे जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जाहीर केल्यानंतर आज दुपारनंतर शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. मात्र या पावसामुळे प्रशासनाच्या तयारीचा अभाव पुन्हा एकदा समोर आला. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई न झाल्याने शहरातील अनेक भागांत पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. विशेषतः दापोडी परिसरातील भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. काही ठिकाणी वाहतूक मंदावली तर काही रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांना पायी चालणेही कठीण झाले. स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त करण्यात येत असून, दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करण्याची मागणी होत आहे. अचानक पडणाऱ्या पावसामुळे शहरातील पायाभूत सुविधांची वास्तविक स्थिती समोर येत असून, तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने नालेसफाई आणि पाणी निचऱ्याची कामे तातडीने हाती घ्यावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.






