मास्टर माईंड ग्लोबल स्कूलमध्ये गणेशोत्सव उत्साहात साजरा
शिक्षण विश्व: ढोलताशांच्या गजरात बाप्पाला निरोप
पिंपरी-चिंचवड : मास्टर माईंड ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये यंदाही गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचा सहभाग, शिक्षकांची उत्स्फूर्तता आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती यामुळे संपूर्ण परिसर उत्साही वातावरणात न्हाऊन निघाला.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शाळेच्या आवारात गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली होती आणि भक्तिभावपूर्ण पूजनानंतर बाप्पाचे विसर्जन ढोलताशांच्या गजरात करण्यात आले.
विसर्जनाच्या दिवशी शाळेत विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने सत्यनारायण महापूजाही पार पडली. या महापूजेसाठी संस्थेच्या संस्थापिका जयश्री गवळी उपस्थित होत्या. त्यांच्यासोबतच शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ प्रदीपा नायर आणि प्रशासक मनीकंदन नायर यांचीही विशेष उपस्थिती लाभली. या कार्यक्रमात शिक्षकांच्या गटांमध्ये नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सर्व शिक्षकांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांप्रमाणेच आपली कला सादर करत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
विद्यार्थ्यांनी गणेशाच्या विविध नामांविषयी माहिती देणारे नाट्य सादर केले. यासोबतच निनाद ढोल ताशा पथकाने देखील आपले वादन सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ढोल ताशांच्या तालावर शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनीही उत्साहाने सहभाग घेतला. संपूर्ण परिसर ढोलताशांच्या निनादात दुमदुमला होता.
अखेर सर्वांनी “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या” असा गजर करत आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. मास्टर माईंड ग्लोबल स्कूलमधील हा पारंपरिक आणि सांस्कृतिक उत्सव विद्यार्थ्यांमध्ये एकात्मता, भक्ती आणि संस्कृतीची जागरूकता निर्माण करणारा ठरला.





