पिंपरी-चिंचवड उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची निवड; जाणून घ्या अल्पपरिचय!
सखी मंचच्या माध्यमातून महिलांसाठी कार्य : सेवा, संवेदनशीलता आणि विकास ही त्रिसूत्री
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसदस्या तथा उपमहापौर सौ. शर्मिला राजेंद्र बाबर या सामाजिक, शैक्षणिक व विकासाभिमुख कार्यासाठी ओळखल्या जातात. त्यांनी सन २०१७ ते २०२२ या कालावधीत प्रभाग क्रमांक १५, निगडी-आकुर्डी प्राधिकरण येथून भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगरसेविका म्हणून प्रभावी कामगिरी बजावली.
इतिहास विषयात एम.ए. (Master of Arts) पदवीधर असलेल्या शर्मिला बाबर यांनी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभांमध्ये १०० टक्के उपस्थिती राखत जबाबदार लोकप्रतिनिधीची भूमिका बजावली. त्या शिक्षण समितीच्या सक्रिय सदस्य व उपसभापती राहिल्या असून शहराच्या विकास प्रक्रियेत आणि निर्णयप्रक्रियेत त्यांचा थेट सहभाग राहिला आहे.
सन २०१९-२०२० व २०२०-२०२१ या सलग दोन वर्षे त्यांनी ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग अध्यक्ष म्हणून कार्य केले. तसेच त्या ‘शर्मिला बाबर सखी मंच’च्या अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक, आरोग्य व जनजागृती उपक्रम राबविण्यात आले.
निगडी-आकुर्डी प्राधिकरण परिसरात दरवर्षी रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिरे, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ व ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण आयोजित करून नागरिकांशी संवाद वाढविण्यावर त्यांनी भर दिला.
महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक व सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध शासकीय योजना प्रत्यक्षात पोहोचवण्यासाठी अर्ज भरणे, कागदपत्रे, ई-केवायसी, पेन्शन, आरोग्य सेवा, बचतगट, रोजगाराभिमुख प्रशिक्षण आदी बाबींमध्ये त्यांनी सातत्याने मार्गदर्शन केले. युवकांसाठी क्रीडा साहित्य वितरण, मैदान विकास व करिअर मार्गदर्शनावरही त्यांनी विशेष लक्ष दिले.
माझा प्रभाग म्हणजे माझा परिवार…
“माझा प्रभाग म्हणजे माझा परिवार” या भावनेतून नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नाकडे वैयक्तिक जबाबदारी म्हणून पाहणे, संकटात साथ देणे व आनंदात सहभागी होणे, हेच आपले कर्तव्य असल्याचे त्या सांगतात. त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्यात पती तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि भाजप मंडल अध्यक्ष राजेंद्रजी बाबर यांची त्यांना मोलाची साथ लाभली आहे. सेवा, संवेदनशीलता आणि विकास ही त्रिसूत्री जपत शर्मिला बाबर यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या सार्वजनिक जीवनात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.




