भोसरीतील महापालिकेच्या रुग्णालयात गंभीर रुग्णांवर उपचार नाहीत
भाजपाचे शहर चिटणीस सचिन काळभोर यांचा आंदोलनाचा इशारा"

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन भोसरी रुग्णालयात गंभीर रुग्णांवर उपचार न करता त्यांना खासगी रुग्णालयात पाठवले जात असल्याचा गंभीर आरोप भाजपाचे शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी केला आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित डॉक्टरांवर कारवाई न झाल्यास रुग्णालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सचिन काळभोर यांनी यासंदर्भात महापालिका प्रशासनाला निवेदन दिले असून, रुग्णालयातील अतिदक्षता विभाग (ICU) असूनही तिथे गंभीर रुग्णांना दाखल करून न घेण्याची तक्रार त्यांनी मांडली. त्यांनी सांगितले की, “महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून हे रुग्णालय उभारले असून, तिथे अनुभवी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध आहेत. मात्र ICU मध्ये रुग्णांना दाखल करून न घेता त्यांना थेट खासगी रुग्णालयात पाठवले जात आहे, ज्यामुळे उपचाराची विलंब होतो आणि रुग्णाच्या प्राणाला धोका निर्माण होतो.”
हेही वाचा – बंगळुरूचे पोलिस आयुक्त, ACP-DCP अन् हवालदारपर्यंत सगळेच निलंबित, RCB विरोधात गुन्हा, मुख्यमंत्र्यांची घोषणा
त्यांनी आरोप केला की, “महापालिकेच्या इतर रुग्णालयांमध्ये ICU नेहमी फुल्ल असतात आणि वेटिंग लिस्ट लागते. मात्र नवीन भोसरी रुग्णालयात ICU असूनही त्याचा उपयोग केला जात नाही. यामागे काही डॉक्टरांचे खासगी रुग्णालयांशी आर्थिक हितसंबंध असल्याचा संशय नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.”
सचिन काळभोर यांनी प्रशासनाला स्पष्टपणे सांगितले की, जर तात्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई केली नाही, तर नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो आणि या निष्क्रियतेविरोधात तीव्र आंदोलन उभारले जाईल. त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील.
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना असून, महापालिकेच्या आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. आता या प्रकरणात महापालिकेची काय भूमिका राहते आणि पुढील कारवाई काय होते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.